इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये नवीन धोरणाला विरोध करण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन करणाऱ्या शालेय शिक्षकांवर आज लाठीमार करण्यात आला. आंदोलनकर्त्या शिक्षकांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि शिक्षकांवर लाठीमारही केला.
पंतप्रधान इम्रान खान यांच्या घरासमोरचा रस्ता शिक्षकांनी अडवून धरल्यामुळे वाहतुक खोळांबली होती. त्यामुळे त्यंच्यावर लाठीमार करण्यत आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
या ठिकाणी शिक्षकांनी पुन्हा आंदोलन करू नये, यासाठी हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी अधिक प्रशिक्षित पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. या परिसरातील बंदोबस्तावर दहशतवाद विरोधी दल आणि दंगल नियंत्रण विभागाच्या पोलिसांना तैनात केले गेले आहे. आंदोलनकर्त्या शिक्षकांपैकी अनेकांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये ताब्यात घेतले गेले आहे. सरकारी कामात हस्तक्षेप आणल्याच्या आरोपावरून चार शिक्षकांना अटक करण्यात आली अहे.
शिक्षण विभागाच्या काही नियमांविरोधात पंजाब प्रांतातील 700 शिक्षक इस्लामाबादेत आले होते आणि त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. लोकसेवा अयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या आणि मुलाखतीद्वारे निवडल्या गेलेल्या शिक्षकांनाच सेवेत नियमित करण्याचा नवीन नियम लागू केला जाणार आहे. त्याविरोधात हे शिक्षक आंदोलन करत होते.
शिक्षकांवरील कठोर कारवाईवर प्रमुख विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. ताब्यात घेतलेल्या शिक्षकांची ताबडतोब सुटका केली जावी, अशी मागणी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सरचिटणीस सय्यद नयार बुखारी यांनी केली आहे. तर या कारवाईबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांना लाज वाटली पाहिजे, अशी टीका पाकिस्तान् मुस्लिम लीग- नवाझ ग्टाच्या नेत्य मरियम औरंगझेब यांनी केली.