बेशिस्त चालकांना पोलिसांचा लगाम

832 वाहनचालकांवर कारवाई : विरुद्धदिशेने वाहन चालविणाऱ्यांना दाखविला पोलीसी हिसका
पुणे – वेळ वाचविण्यासाठी बहुतांश चालक “शॉर्टकट’ म्हणून वाहतुकीच्याविरुद्ध दिशेने वाहन चालवतात. मात्र, हाच “शॉर्टकट’ त्यांच्या जीवावर बेतत आहे. वारंवार प्रबोधन करूनही वाहनचालक जागरूक नसल्याने वाहतूक पोलिसांना कारवाईचा बडगा उगारला असून दि. 1 ते 30 डिसेंबर दरम्यान हयगयीने, बेदकारपणे आणि रस्त्याच्याविरुद्धदिशेने वाहन चालविणाऱ्या सुमारे 832 वाहनचालकांवर भारतीय दंड विधानच्या कलम 279 नुसार वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
चालकांना वावडे जनजागृती करून फरक पडेना
“त्या’ चालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
24 विभागांत कारवाई
“शॉर्टकट’ मार्गांचा अवलंब करण्यात तरुणाई अग्रेसर
अपघात रोखण्याचे पोलिसांचे प्रयत्न
दिवसेंदिवस शहरातील “बेशिस्त’ वाहनचालकांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे विनाहेल्मेट, झेब्रा क्रॉसिंग न थांबणे आदी कारवायांच्या बरोबरीने “रॉंग साईड’ने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. 1 ते 30 डिसेंबर दरम्यान हयगयीने, बेदकारपणे आणि रस्त्याच्याविरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या सुमारे 832 वाहनचालकांवर भारतीय दंड विधानच्या कलम 279 नुसार वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. याअंतर्गत 6 महिन्यांपर्यंतचा कारावास आणि एक हजार रूपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष मोहीम घेण्यात येत आहे. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरून यांच्या मार्गदर्शनाखाली 24 विभागांतील ही कारवाई करण्यात आली.
“ट्रॅफिक क्लब’वर सूचना पाठवता येणार
वाहतुकीच्या समस्येबाबत वाहतूक शाखेच्या “ट्विटर’ खाते, सतर्क ऍप किंवा 8411800100 या व्हॉट्सऍप क्रमांकावर नागरिक संपर्क साधू शकणार आहेत. यासह वाहतूक विभागाच्या “ट्रॅफिक क्लब’ या व्हॉट्सऍप ग्रुपवर तक्रारी आणि सूचना पाठवता येणार आहेत.





