प्रभात वृत्तसेवा ओतूर – ब्राह्मणवाडा रोडवरील संकल्प पॅराडाईजमध्ये झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास लावून पोलिसांनी सुमारे ३ लाख ८७ हजार २०० रुपये किमतीचा चोरीला गेलेला मुद्देमाल फिर्यादीला परत केला आहे. पोलिसांच्या या तत्पर कामगिरीबद्दल नागरिकांमधून मोठे कौतुक होत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, येथील मंदाकिनी लक्ष्मण डुंबरे यांच्या रूम नं ३०२ मध्ये दिनांक १२ रोजी मध्यरात्री २ ते सकाळी ६ च्या दरम्यान चोरी झाली होती. फिर्यादी व त्यांचे पती झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने हॉलच्या खिडकीतून प्रवेश करून ३ तोळे ८ ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र, पोको कंपनीचा मोबाइल आणि पितळेची गायीची मूर्ती असा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस हवालदार बाळशिराम भवारी यांच्याकडे तपासाची चक्रे सोपवण्यात आली होती.पोलिसांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला असता, हा गुन्हा अक्षय दिलीप घादवड (वय १९, सध्या रा. ओतूर, मूळ रा. माळेगाव पठार, ता. संगमनेर) याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीचा माल स्वतःच्या घरात लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीच्या घरातून ३ लाख ८० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, १२०० रुपयांची पितळी मूर्ती आणि ६ हजार रुपयांचा मोबाइल असा एकूण ३ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.जप्त केलेला हा सर्व ऐवज बुधवारी (दि. १७) रोजी फिर्यादी मंदाकिनी डुंबरे यांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळशिराम भवारी, नरेंद्र गोराणे, देविदास खेडकर, विलास कोंढावळे आणि ज्योतीराम पवार यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.