पिंपरी – ‘दैनिक प्रभात’ने 22 फेब्रुवारी रोजी ‘रोज सहा ते सात जण बेपत्ता’ या मथळ्याखाली पिंपरी-चिंचवड शहरातून बेपत्ता होणाऱ्या नागरिकांबाबत वृत्त प्रकाशित केले. त्या वृत्ताची पिंपरी चिंचवड पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. ‘दैनिक प्रभात’ने दिलेल्या वृत्तानंतर पोलिसांनी बेपत्ता नागरिकांना शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. वेगवेगळ्या कारणांनी घर सोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून दररोज सहा ते सातजण बेपत्ता होत आहेत. मागील वर्षी सन 2022 मध्ये पिंपरी-चिंचवड शरहातून दोन हजार 671 व्यक्ती बेपत्ता झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात 199 तर फेब्रुवारी महिन्यात 149 जण बेपत्ता झाले आहेत. त्यातील मिळून येणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे बेपत्ता होणाऱ्या व्यक्ती जातात कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांकडून मिसिंग ड्राइव्ह नावाने मोहीम राबवली जाते. मात्र मागील काही महिन्यांपासून अशी मोहीम राबवलेली नसल्याचे प्रभातने अधोरेखित केले होते. स्मृतिभ्रंश सारख्या इतर आजारांमुळे नागरिकांचे स्वतःवर नियंत्रण राहत नाही. ते अचानक बाहेर पडतात आणि बेपत्ता होतात. आई-वडिलांच्या भांडणात मुलांचा ताबा मिळविण्यासाठी पालकांकडून एकमेकांच्या परवानगीशिवाय मुलांना नेले जाते. अशा प्रकरणात देखील मुलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली जाते. घरातील एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळते. प्रेमविवाह करण्यासाठी जोडीदारासोबत पळून जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अल्पवयीन मुले देखील अशा कारणासाठी घराचा उंबरा ओलांडत असल्याने त्याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. बेपत्ता व्यक्तींना शोधण्यासाठी पोलिसांनी सातत्याने विशेष मोहिमा राबविण्याची गरज असल्याची गरज प्रभातने वृत्तातून व्यक्त केली. दररोज पाठवावा लागणार अहवाल दैनिक प्रभातच्या वृत्ताची दखल घेत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 ते 8 मार्च या कालावधीत मिसिंग व्यक्ती, महिला, पुरुष, मुले, मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले. सर्व प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन स्तरावर मिसिंग स्कॉड नेमण्यात येणार आहेत. दररोज केल्या जाणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल वरिष्ठांना पाठवावा लागणार आहे.