हिंगोली : राज्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील स्थानिक वाद आता विकोपाला गेला आहे. कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरी पहाटेच्या सुमारास तब्बल १०० पोलिसांनी धाड टाकून झाडाझडती घेतल्याची माहिती विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली आहे. हा सर्व प्रकार भाजपचे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या दबावाखाली झाला असल्याचा गंभीर आरोप हेमंत पाटील यांनी केला आहे. हिंगोली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद उफाळून आला आहे, जिथे भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते आमनेसामने आहेत. धाडीवरून राजकारण तापले – “पहाटे पाच वाजता १०० पोलिसांनी धाड टाकली. बांगर यांची ७५ वर्षांची आई आजारी असताना त्यांच्या घराची झाडाझडती घेणे, हा अतिशय वाईट प्रकार आहे. ही कारवाई गुंड किंवा दहशतवाद्याच्या घराची झाडाझडती घेतल्यासारखी होती,” असे हेमंत पाटील म्हणाले. आमदाराच्या घरावर धाड टाकण्यासाठी विधानसभा अध्यक्षांची पूर्वपरवानगी आवश्यक असते, पण तसा कोणताही आदेश नव्हता. त्यामुळे सत्ताधारी आमदार मुटकुळे यांच्या दबावामुळेच ही कारवाई झाली, असा संशय त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार – या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, आपण दोन्ही जिल्ह्यातील आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले. राज्यात समान वाटेकरी असताना स्थानिक भाजप आमदार पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे त्यांनी म्हटले. मुटकुळेंची बांगर यांच्यावर टीका – दुसरीकडे, भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “संतोष बांगर हा हिंगोली जिल्ह्याला लागलेला कलंक आहे. ते पैशांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांचे अनेक अवैध धंदे आहेत,” अशी टीका मुटकुळे यांनी केली. सत्तांतराच्या काळात बांगर यांनी ‘५० खोके’ घेतले हे सत्य असल्याचा दावाही त्यांनी केला.