खालापूर – खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ शांततेत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त पार पडावी, यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी सोमवारी (दि. २४) खोपोली शहरातील सर्व प्रभागांची निवडणूकपूर्व सुरक्षा पाहणी केली. निरीक्षणादरम्यान डॉ. नेहुल यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत पोलिसांना सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. निष्पक्ष, निर्भय आणि दबावमुक्त निवडणूक घेणे ही आमची जबाबदारी असून कोणत्याही प्रकारची अनुचित हालचाल सहन केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. शहरातील संवेदनशील भाग, मतदान केंद्रांची रचना, पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, सीसीटीव्ही कव्हरेज तसेच असामाजिक घटकांवर लक्ष ठेवण्याबाबत त्यांनी तातडीच्या सूचना दिल्या आहेत. आगामी २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षेतील त्रुटी दूर करण्याचे निर्देशही डॉ. नेहुल यांनी अधिकाऱ्यांना दिले. ईव्हीएम मशीनची सुरक्षित वाहतूक, स्ट्राँगरूम सुरक्षा, मतदान केंद्राबाहेरील गर्दी नियंत्रण, तसेच निवडणूक काळात वाढीव पोलीस गस्त यांची बारकाईने तपासणी करण्यात आली. याच अनुषंगाने खोपोली पोलिसांनी शहरात दंगा काबू पथकाची योजना राबवली असून, पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्चही काढण्यात आला. या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढला असून कायदा-सुव्यवस्थेवरील पोलिसांचे नियंत्रण दृढ असल्याचे चित्र दिसून आले. खोपोलीतील सर्व मतदान केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहेत. निवडणूक काळात कुणालाही गैरप्रकार करण्याची संधी मिळणार नाही, असा ठाम संदेश पोलिसांनी दिला आहे. प्रशासनाच्या या कडक तयारीमुळे खोपोली नगरपरिषद निवडणूक अत्यंत शांततेत व सुरळीत पार पडण्याची शक्यता आहे.