पिंपरी : मध्यवस्तीत असणाऱ्या एका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यास आणि त्यांच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे करोनाबाधित चऱ्होलीत वास्तव्यास होते. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या करोनाबाधितांची संख्या ४० वर पोचली आहे.
माहितीनुसार, पिंपरीमधील चऱ्होलीत राहणाऱ्या आणि पुण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास आणि त्यांच्या पत्नीस करोनाची लागण झाली आहे. कर्मचारी वाहन चालक असून, त्याच्या संपर्कातील सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.
दरम्यान, सध्या पिंपरी चिंचवड शहरात ३६ करोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर अन्य चार जणांवर पुण्यातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. आत्तापर्यंत १३ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. तर एकाचा यापूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या ५४ गेली आहे.