छोट्याशा खोलीत शंभर टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती पिंपरी – पोलीस आयुक्तालयातील छोट्याशा खोलीत 100 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यात आली. त्यातच आम्ही करोनाला रोखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना विविध साधन सामग्री पुरवित आहोत. त्यांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे देत आहोत. यामुळे करोना आमच्या कर्मचाऱ्याभवती फिरकणारही नाही, हा फाजील आत्मविश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नडला. त्यातून आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. ज्यांचे वय 50 पेक्षा अधिक आहे किंवा त्यांना काही पूर्वीच्या व्याधी आहेत, अशा कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. एवढेच नव्हे तर तारांकित रुग्णालयात पोलिसांच्या तपासणीची सोय करण्यात आली. विविध कंपन्यांना प्रायोजक बनवून पोलिसांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध प्रकारची औषधे उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्यक्ष बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना फेस शिल्ड, मास्क, हॅन्डग्लोज इत्यादी साधन सामग्रीही देण्यात आली. काही कर्मचारी पुण्यात राहण्यास होते. त्यांना शहरात राहण्यासाठी लॉजही उपलब्ध करून दिले आहे. पुणे, मुंबई, मालेगाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांना करोनाची लागण होत असताना मात्र पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील पोलीस सुरक्षित असल्याचा अभिमानही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना होता. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचा हा भ्रम दूर झाला. सुरक्षित अंतराचा फज्जा सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अवघी पाच टक्के उपस्थिती ठेवण्यात आली. मात्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 100 टक्के उपस्थिती ठेवण्यात आली. अगदी खूर्चीला खूर्ची टेकून कर्मचारी काम करीत होते. इतरांना सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याच कार्यालयातील ही स्थिती का दिसली नाही, असा सवालही यानिमित्ताने पुढे आला आहे. दंड वसुलीसाठीही केली सक्ती विनाकारण शहरात फिरणाऱ्या टवाळखोरांना आळा बसावा, यासाठी वाहतूक पोलिसांना सांगून करोनाच्या महामारीतही दंड वसूल करण्याचा धडाका अधिकाऱ्यांनी लावला. मनात भीती असूनही वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दिलेले टार्गेट पूर्ण करीत होते. त्यापैकी एखाद्या वाहन चालकाला करोना असता तर त्याची लागण कर्मचाऱ्यास होईल, अशी भीतीही अधिकाऱ्यांना वाटली नाही. पेंडन्सीकरिता बैठकांचा धडका करोनाचे संकट नसताना अधिकारी कर्मचारी यांना पेंडन्सी कमी करण्यासाठी सक्ती करण्यात आली होती. सध्या पोलीस बंदोस्ताच्या कामावर असतानाही पेंडन्सीकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बैठकांचा धडाका सुरू होता. पिंपरी चिंचवडचे आयुक्तालय छोटे आहे. त्यात बैठक घेण्यासाठी प्रशस्त हॉलही नाही. अशावेळी बैठकांकरिता येणारे अधिकारी सुरक्षित अंतर ठेवणार तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची फिकीर नव्हती. त्या कर्मचाऱ्यांनाही सूट नाही मुंबईत करोनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने 50 वर्षावरील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर बोलविण्यात येत नव्हते. पिंपरी चिंचवडमध्ये मनुष्यबळ कमी असल्याचे सांगत निवृत्तीला आलेल्या कर्मचाऱ्यांनाही ड्यूटी लावण्यात आली होती. तसेच गरोदर महिला कर्मचाऱ्यांनाही कर्तव्यावर येण्याची सक्ती करण्यात आली. यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही सध्या पोलीस कर्मचारी अत्यंत दाटीवाटीने बसून काम करीत आहेत. त्यामध्ये एक दिवसाआड 50 टक्के कर्मचारी कामावर बोलावून करोनाचा धोका कमी करता येऊ शकतो. मात्र यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे.