Pune Rural : प्रभातच्या वृत्तानंतर जांबूत कृषीपंप चोरीप्रकरणी पोलिसांकडून पाहणी

जांबूत : जांबूत (ता.शिरूर) येथील कुकडीनदी काठावर गुरुवार ( दि.१०) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पाच शेतकऱ्यांचे कृषीपंप चोरून नेल्याची घटना घडली आहे. तसेच मागील पंधरा दिवसांपूर्वी शरदवाडी (ता. शिरूर) येथील दहा शेतकऱ्यांचे सुमारे चार लाखांहून अधिक किमतीचे कृषीपंप चोरून नेले होते याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.
यादरम्यान, जांबूत आणि शरदवाडी येथील दोन्ही घटनांचे गांभीर्य लक्षात घेता “ प्रभात” मधून वृत्त प्रसिद्ध होताच शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी आपले कर्मचाऱ्यांसह जांबूत येथे भेट देत घटनेची पाहणी करत या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. तसेच पारनेर तालुक्याच्या हद्दीतीलही सुमारे १५ शेतकऱ्यांचे कृषीपंप यावेळी चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला असल्याचे दिसून येत आहे.
शरदवाडी आणि जांबूत येथील शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक हानी पोहचविणाऱ्या संशयास्पद आणि मुख्य आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करणार असून या दोन्ही घटनांचा जलदगतीने तपास सुरु केला असल्याचे यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.
नागरिकांची मागणी
या आधीच्या काळात या भागात नियमित रात्र गस्त घालण्यात येत असल्याने अशा प्रकारच्या घटना घडण्याचे प्रमाण कमी झाले होते मात्र अलीकडील काळात रात्र गस्तीत अनियमितता आढळून येत असल्याने छोट्या मोठ्या चोऱ्या होण्याचे वाढते प्रमाण हे नागरिकांमध्ये भीती निर्माण करणारे असून रात्रीच्या वेळी ग्रामसुरक्षा दलातील युवकांना सोबत घेऊन गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
डिजिटल प्रभातवर प्रसिद्ध झालेली बातमी : Shirur News : शिरुर तालुक्यातील या गावात कृषीपंपाचे चोरीचे प्रकार वाढले; शेतकऱ्यांची पोलिसांच्या कामकाजावर नाराजी





