प्रभात वृत्तसेवा पुणे – पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत शहराच्या मध्यवस्तीत लक्ष्मी रोडलगत असलेल्या महापालिकेच्या क्रीडामहर्षी हरिभाऊ साने वाहनतळावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. मात्र, या ठिकाणी एक सहायक पोलीस निरीक्षकच जुगार खेळताना सापडला. त्याला तातडीने निलंबित करण्याचे आदेश पोलीस मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी दिले.या कारवाईत ३३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, पत्त्यांचे ४ कॅट, २५ मोबाइल असा एकूण ४ लाख ९३ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ३० जुलै रोजी सायंकाळी उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. पथकात पोलीस निरीक्षक अरुण घोडके, सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, उपनिरीक्षक विशाल पाटील, गायत्री पाटील, प्रदीप खाडे, तसेच हवालदार आणि पोलीस अंमलदारांचा समावेश होता.विशेष म्हणजे या अड्ड्यावर हडपसर, मांजरी, बिबवेवाडी, कोंढवा, पाषाण, येरवडा, कोरेगाव पार्क यांसारख्या विविध भागांतील लोक खेळत होते. त्यापैकी एकजण सहायक पोलीस फौजदार निघाला. त्याच्याकडून रोख साडेपाच हजार आणि एक मोबाइल जप्त करण्यात आला. हा वाहनतळ महापालिकेने ठेकेदारास चालविण्यास दिला आहे. यांना झाली अटक प्रवीण बोदवडे, दत्तू राजगुरू, जितेंद्र कांबळे, मनीष वाघ, अब्बास शेख, विश्वनाथ महतो, अमिताभ कुमार, राज गायकवाड, संजय जगताप, दीपक परब, विशाल घुले, योगेश बनकवडे, विशाल बष्टे, मिथुन पीडीयार, काळुराम खोपडे, राकेश क्षीरसागर, आबेद शेख, अमोल मोहिते, विनय साळवी, महेश भूतकर, अंकुश अहिवळे, दर्पण ठक्कर, प्रदीप ढावरगावे, फुलचंद यादव, प्रमोद चौधरी, भारत मारवाडी, विवेक कामठे, गौरव जाधव, जालिंदर सूर्यवंशी, योगेश साळवी आणि ज्ञानेश्वर बालपांडे.