Baljit Singh: घरातून दुर्गंधी येताच पोलिसांना दिली माहिती; पंजाबी गायक बलजीत सिंग यांचा मृतदेह सापडला, मृत्यूबाबत गूढ कायम
Baljit Singh बलजीत सिंग यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. घराचा दरवाजा उघडल्यानंतर गायकाचा मृतदेह बेडवर आढळून आला.

Baljit Singh: पंजाबी संगीतविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाबी गायक आणि लेखक बलजीत सिंग यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. लुधियाना जिल्ह्यातील सुधार पट्टी धालीवाल गावात गुरुवारी, 3 सप्टेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. बलजीत सिंग हे घरात एकटेच राहत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क झाला नव्हता.
बलजीत सिंग यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. घराचा दरवाजा उघडल्यानंतर गायकाचा मृतदेह बेडवर आढळून आला.
मृत्यू चार-पाच दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज
मृतदेहाची अवस्था पाहता बलजीत सिंग यांचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचा मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता सांगितली जात आहे.
घटनास्थळी घरात काही ठिकाणी रक्ताचे डाग आढळल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे सुरुवातीला हा प्रकार संशयास्पद असल्याचे मानले जात होते. पोलिसांनी घराची पाहणी करत महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.

Punjabi Singer Baljeet Singh
पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास
बलजीत सिंग गेल्या काही दिवसांपासून कुठे होते, त्यांच्याशी कोणाचा संपर्क झाला होता आणि त्यांच्या घरी कोण कोण आले होते, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन आणि पुढील तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, प्राथमिक वैद्यकीय माहितीनुसार बलजीत सिंग यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळ्या शक्यता समोर येत असल्या तरी पोलिसांनी कोणत्याही घातपाताची शक्यता निश्चितपणे सांगितलेली नाही. घटनास्थळी आढळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तपास मात्र सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी हरियाणवी गायकाचीही हत्या
गायकांच्या मृत्यूच्या घटनांमुळे संगीतविश्वात चिंता व्यक्त केली जात असतानाच काही दिवसांपूर्वी हरियाणवी गायक अंकित बालियान यांच्या हत्येची घटना घडली होती. शामली येथे एका जिमबाहेर अंकित बालियान यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, जिममधून बाहेर पडताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बलजीत सिंग यांच्या मृत्यूमुळे पंजाबी संगीतविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि या प्रकरणामागे कोणते कारण आहे, हे पोलिसांच्या पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


