Pimpari : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा पाहणी दौरा

पिंपरी : संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने व्यापक नियोजन सुरू केले आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आळंदी व देहू येथे पाहणी दौरा करून सुरक्षाव्यवस्था आणि वाहतूक नियोजनाचा आढावा घेतला.
या दौऱ्यात सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे, उपायुक्त विशाल गायकवाड (परि-२), स्वप्ना गोरे (परि-१), डॉ. शिवाजी पवार (परि-३), मुख्यालयाचे उपायुक्त विवेक पाटील, वाहतूक उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कोपनर (देहूरोड), राजेंद्रसिंह गौर (चाकण), डॉ. विशाल हिरे (गुन्हे), तसेच वाहतूक शाखेचे भास्कर ढेरे, सतिश कसबे, वाकड विभागाचे सुनील कु-हाडे, पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे (देहूरोड), भिमा नरके (आळंदी), बापू ढेरे (दिघी) आणि इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
वारी प्रस्थानासाठी १८ जून रोजी देहू आणि १९ जून रोजी आळंदी येथे हजारो वारकरी उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त चौबे यांनी आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, देहूतील संत तुकाराम महाराज मंदिर, पालखी मार्ग, वाहनतळ, गर्दी नियंत्रण व्यवस्था, मनुष्यबळाचे नियोजन आणि आपत्कालीन उपाययोजनांची बारकाईने पाहणी केली. वारकऱ्यांना भक्तीमय, आनंददायी आणि सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.वारीच्या निमित्ताने भक्ती आणि सुरक्षेचा संगम साधत पोलिसांकडून नागरिकांच्या सहकार्याने संयोजनबद्ध तयारी सुरू आहे.





