Pimpri : वाहतूक कोंडीची पोलीस आयुक्तांकडून पाहणी

हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्कमधील भीषण वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी केली. महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवल्या.
यावेळी सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, पीएमआरडीएचे दीपक सिंगला, वाहतूक उपायुक्त विवेक पाटील आदींचा समावेश होता.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केलेल्या पाहणीत हिंजवडीतील काही प्रमुख रस्त्यांवर प्रायोगिक स्वरूपात एकेरी वाहतूक सुरू केली जाणार आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी बॅरिकेड्स लावण्यात आले असून, ‘फ्री लेफ्ट’ मार्ग खुले करण्यासाठी अडथळे हटवले जात आहेत.
या संपूर्ण मोहिमेचा ५७ पानी जिओ-टॅग केलेला अहवाल ‘अनक्लॉग हिंजवडी आयटी पार्क’ टीमने पोलीस आयुक्तांना सादर केला आहे. अहवालानुसार, पुढील ३ ते ४ महिन्यांत परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
हिंजवडीतील लाखो आयटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळवून देणारी ही कारवाई वाहतूक नियोजनाच्या दिशेने एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे.
या महत्वाच्या उपाययोजना करणार
मेट्रो जिन्याची रुंदी कमी करून वाहतुकीसाठी एक लेन उपलब्ध करणार.
विप्रो सर्कलवर ‘फ्री लेफ्ट’ सुरू करण्यात आला.
डॉलर कंपनीजवळील अतिक्रमण हटवण्याचे आदेश.
मेगा पोलीस सर्कलमध्ये बससाठी स्वतंत्र जागा.
एमआयडीसी सर्कलवर बॅरिकेडिंगने रांग सावरली.
बॅरिकेड्स, मनुष्यबळ आणि कायमस्वरुपी तसेच पोर्टेबल सिग्नल उपलब्ध होण्याबाबत पोलिस आयुक्त आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. वाहतूक सुरळीत होण्याबाबतच्या नियोजनाला प्राधान्य देण्यात येत आहे.
– सचिन लोंढे, सदस्य, ‘अनक्लाॅग हिंजवडी आयटी पार्क’ मोहीम





