Pune Police : ‘टोकाचे पाऊल उचलेन’ म्हणत आयुक्तांना मेसेज; पोस्टिंगसाठी अमलदाराचा दबावाचा प्रयत्न?
Pune Police : साईट पोस्टिंगच्या नाराजीतून मोबाइल बंद करून झाला गायब; पोलिसांनी शोधून आयुक्तालयात आणले

Pune Police : मनासारखी पोस्टिंग मिळत नसल्याच्या नाराजीतून एका पोलीस अमलदाराने थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना ‘टोकाचे पाऊल उचलण्याचा’ इशारा देणारा मेसेज केल्याचा प्रकार समोर आला आहे. मेसेज केल्यानंतर मोबाइल बंद करून संपर्काबाहेर गेलेल्या या अमलदाराचा पोलिसांनी शोध घेतला. त्याला आयुक्तालयात आणल्यानंतर आयुक्तांनी त्याला चांगल्याच कानपिचक्या दिल्याची माहिती आहे. त्यामुळे सहानुभूती मिळवून पोस्टिंग बदलून घेण्याचा प्रयत्न उलटल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आरोप असलेल्या अनेक अमलदारांना महत्त्वाच्या नियुक्त्यांपासून दूर ठेवले आहे. या अमलदाराचीही मुख्यालयासह साईट पोस्टिंगवर नियुक्ती करण्यात आली होती.
मुख्यालयातील नियुक्ती आणि अपेक्षित तपास पथक किंवा गुन्हे शाखेत संधी मिळत नसल्याने तो नाराज असल्याचे सांगितले जाते. त्यातूनच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळल्याचे सांगत त्याने आयुक्तांना भावनिक स्वरूपाचा मेसेज केल्याची माहिती आहे. आपल्याविरोधात निनावी तक्रारी केल्या जात असून, बंदोबस्ताच्या ठिकाणी झालेल्या वादामुळेही त्रास होत असल्याचे त्याने मेसेजमध्ये नमूद केल्याचे समजते.
मेसेजनंतर मोबाइल बंद झाल्याने प्रशासनाने प्रकरण गांभीर्याने घेत त्याचा शोध सुरू केला. अखेर त्याला शोधून आयुक्तालयात आणण्यात आले. आयुक्तांनी त्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर अशा प्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे समजते.




