Vikas Lawande: वारकरी संप्रदायाबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या संदर्भात वाघोली पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये गंभीर चूक झाल्याचे उघड झाले आहे. ही चूक “नजरचुकीने” झाल्याची कबुली अखेर पोलिसांनी न्यायालयात दिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विकास लवांडे यांच्याविरोधात वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, लवांडे यांना जामीन मिळू नये यासाठी पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये त्यांच्या नावावर पूर्वीचे गुन्हे असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. चुकीचा गुन्हा क्रमांक नमूद – पोलिसांनी २०१७ मधील एका आंदोलनासंदर्भातील गुन्ह्याचा दाखला देताना चुकीचा गुन्हा क्रमांक नमूद केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, २०१७ मधील तो राजकीय आंदोलनाचा गुन्हा राज्य सरकारने २०२२ मध्येच मागे घेतला होता. मात्र, रिमांड रिपोर्टमध्ये दुसऱ्याच गुन्ह्याचा क्रमांक नमूद झाल्याने न्यायालयासमोर लवांडे यांच्यावर गंभीर गुन्हे असल्याचा आभास निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने लवांडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. नंतर पोलिसांना आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी न्यायालयात स्पष्टीकरण सादर करत ही माहिती “नजरचुकीने” नमूद झाल्याचे सांगितले. या प्रकारामुळे पोलिसांच्या निष्काळजीपणावर टीका होत असून, चुकीची माहिती न्यायालयासमोर मांडल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही होत आहे. सामाजिक आणि राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची चर्चा सुरू असून, विरोधकांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले आहेत.