मायणी -मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावर रात्रगस्त सुरू असताना पोलिसांनी मायणी (ता. खटाव) पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत आठ लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पथक मंगळवारी पहाटे मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावर रात्रगस्त घालत होते. त्यावेळी तरसवाडी (ता. खटाव) येथून वाळू भरून ट्रक मायणीच्या दिशेने येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख यांना मिळाली.
या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, कमचारी प्रकाश कोळी, योगेश सूर्यवंशी व होमगार्ड हांगे यांनी तरसवाडी घाटात सापळा रचला. त्यावेळी लाल रंगाचा ट्रक (एमएच-45-टी-9664) येताना दिसला. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केल्यानंतर त्यामध्ये वाळू भरलेली दिसली.
चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आठ लाख रुपये किमतीचा ट्रक व 18 हजार रुपये किमतीची तीन ब्रास वाळू, असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहनचालक गोरख संभाजी पिसे (रा. म्हसवड, ता. माण) यास अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी तपास करत आहेत.