नवी दिल्ली – करोनावर रामबाण औषध असल्याचे सांगत एका इसमाने संपूर्ण कुटुंबावरच विषप्रयोग केल्याची घटना घडली आहे. विवाहबाह्य संबंधातून हा गुन्हा घडल्याचे समोर आले आहे.
सध्या करोनाचा धोका वाढत असून त्यामुळेच आमच्याकडे त्यावर औषध असल्याचे सांगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिकांची फसवणूकही होत आहे. याच मानसिकतेचा फायदा घेत ही घटना घडली आहे.
हा विषप्रयोग करण्यासाठी आरोग्यसेवक बनून आरोपीला सहकार्य केलेल्या दोन महिलांनाही अटक करण्यात आली आहे. आपल्या पत्नीचे घराजवळच राहात असलेल्या एका होमगार्डशी अनैतिक संबंध असल्याचा संशय या आरोपीला होता. काहीही करुन त्याला संपवायचे हाच विचार त्याच्या डोक्यात आला व ही काळीमा फासणारी घटना घडली.
येथील अलीपूर भागात हा आरोपी वास्तव्यास आहे. त्याने आणखी दोन महिलांची याकामी मदत घेतली. करोनावर रामबाण औषध आहे असे सांगत त्यांच्याकरवी होमगार्डसह त्याच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्यांनाही हे औषध देण्यात आले. हे औषध घेतल्यावर त्या सर्वांना उलट्याहोऊ लागल्याने रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु झाल्याने त्यांची प्रकृती आता ठिक होत असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनाचा तपास सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत पोलीसांनी या तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.
करोनाचे औषध असल्याचे सांगून गुन्हा घडल्याची ही राजधानीतील दुसरी घटना आहे. यापूर्वी एका महिलेने आपल्या पतीला करोनाची बाधा झाल्याचे दर्शवून त्याचा गळा दाबूऩ खुन केला होता.