Poco M8 5G: शाओमीचा सब-ब्रँड ‘पोको’ने आपली बहुप्रतिक्षित ‘पोको एम८ ५जी’ ही स्मार्टफोन मालिका भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि स्टायलिश डिझाइनचा मेळ घालत हा फोन विशेषतः तरुण आणि मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात या फोनचे अनावरण करण्यात आले. या स्मार्टफोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचा ६.७ इंच ‘फ्लो एएमओएलईडी’ कर्व्ह डिस्प्ले आहे, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ३२०० नीट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यामुळे प्रखर सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट दिसते. अवघ्या ७.३५ मिमी जाडीचा आणि १७८ ग्रॅम वजनाचा हा फोन हाताळण्यासाठी अत्यंत सुटसुटीत आहे. टिकाऊपणाचा विचार करता, याला ‘आयपी६६’ रेटिंग आणि मिलिटरी-ग्रेड प्रमाणपत्र मिळाले असून, ओल्या हातांनीही फोन वापरता येणे शक्य आहे. कार्यक्षमतेसाठी यात ‘स्नॅपड्रॅगन ६ जेन ३’ प्रोसेसर देण्यात आला असून, जो गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी प्रभावी ठरतो. फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सेलचा ड्युअल एआय कॅमेरा आणि सेल्फीसाठी २० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय ५,५२० एमएएचची मोठी बॅटरी आणि ४५ वॅट फास्ट चार्जिंगची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. किमतीच्या बाबतीत पोकोने स्पर्धात्मक धोरण अवलंबले असून, ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची लाँच किंमत १५,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर ८ जीबी रॅमच्या आवृत्त्या १६,९९९ आणि १८,८९९ रुपयांना उपलब्ध होतील. निवडक बँकांच्या कार्ड्सवर २,००० रुपयांपर्यंत तात्काळ कॅशबॅक देखील दिला जात आहे. हा फोन अँड्रॉइड १५ वर आधारित हायपरओएस २ वर कार्य करतो आणि कंपनीने ६ वर्षांच्या सिक्युरिटी अपडेट्सची हमी दिली आहे.