नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित करताना देशातील सर्व नागरिकांचे केंद्र सरकारतर्फे मोफत लसीकरण करण्यात येईल अशी घोषणा केली. यापूर्वी, केंद्र सरकारतर्फे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा भार राज्य सरकारांवर टाकला होता. अनेक राज्य सरकरांनी या केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवला होता. सर्वोच्च न्यायालयाने देखील यावरून केंद्र सरकारला सुनावले होते.
अशातच आज पंतप्रधान मोदी यांनी, राज्य सरकारांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची सोपवण्यात आलेली जबाबदारी मागे घेण्यात आल्याचे सांगितले. यामुळे आता देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत लस मिळणार आहे.
दरम्यान, पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयाचे इंडियन मेडिकल असोसिएशनने स्वागत केले आहे.
“सार्वत्रिक लसीकरणाचा निर्णय घेतल्याबाबत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. आता देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण केंद्र सरकारतर्फे करण्यात येईल. इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधानांनी देशात सुरु केलेल्या लसीकरण मोहिमेला सुरुवातीपासूनच पाठिंबा दर्शवला आहे.” अशी प्रतिक्रिया आयएमएचे अध्यक्ष डॉ. जेए जयालाल यांनी दिली.