PMRDA Sports Projectc : फुटबॉल प्रेमींसाठी मोठी बातमी! आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम सज्ज; पाहा कसं असेल स्वरूप?
PMRDA Sports Project : सेक्टर ३ आणि १२ मधील आंतरराष्ट्रीय फुटबॉल व मल्टी-युटिलिटी गेम अरेना अंतिम टप्प्यात; अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी.

PMRDA Sports Project – शहरातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी (पीएमआरडीए) तर्फे पिंपरी-चिंचवड परिसरात उभारण्यात येत असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल व मल्टी-युटिलिटी गेम अरेना प्रकल्पांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. सेक्टर ३ आणि सेक्टर १२ येथील आरक्षित भूखंडांवर विकसित होत असलेल्या या क्रीडांगणांची गुरुवारी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
पुणे महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधांसाठी (पीएमआरडीए) कडून हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो, रिंग रोड तसेच इंद्रायणी व पवना नदी सुधार प्रकल्प यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यात आल्यानंतर आता शहरातील युवकांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडांगण विकासावरही भर देण्यात आला आहे.
सेक्टर ३ मधील प्रकल्प ८० टक्के पूर्ण
सेक्टर ३ येथे सुमारे ३,५०० चौरस मीटर क्षेत्रावर विकसित होत असलेल्या क्रीडा संकुलाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. येथे ४४ मीटर बाय ३० मीटर आकाराचे फुटबॉल टर्फ तयार करण्यात येत असून “स्क्वॅश कोर्ट” हे या प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. याशिवाय ४० हून अधिक प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था असलेले लहान स्टेडियम, युटिलिटी इमारत, संरक्षक भिंत आणि भूमिगत पाणी साठवण टाकीची कामे पूर्ण झाली आहेत. सध्या मैदानावर टर्फ बसविणे आणि अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक टाकण्याचे काम सुरू आहे.
सेक्टर १२ मध्ये ‘फिफा’ मानकाचे मैदान
सेक्टर १२ येथील प्रकल्प अधिक मोठ्या स्वरूपाचा असून सुमारे १,३०,६०० चौरस मीटर क्षेत्रावर विविध क्रीडा सुविधा उभारल्या जात आहेत. या प्रकल्पाचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. येथे ६८ मीटर बाय १०५ मीटर आकाराचे ‘फिफा’ मानकांचे फुटबॉल मैदान विकसित करण्यात येत आहे. तसेच सुमारे ४०० प्रेक्षक बसू शकतील असे स्टेडियम उभारले जात आहे.
मैदानासाठी आवश्यक परफोरेटेड पाईप व जीएसबी स्तराची कामे पूर्ण झाली असून आसनव्यवस्था आणि युटिलिटी इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक ड्रेनेज सिस्टीम आणि दर्जेदार टर्फ बसविण्यात येत असल्याने पावसाळ्यातही मैदान खेळाडूंसाठी वापरण्यायोग्य राहणार आहे.
शहराचा झपाट्याने होणारा विस्तार लक्षात घेता मोकळ्या जागा व क्रीडांगणांचे महत्त्व वाढत असल्याचेही प्रशासनाकडून नमूद करण्यात आले. पाहणीदरम्यान अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी कामाचा दर्जा आणि गती समाधानकारक असल्याचे नमूद करत उर्वरित कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
“शहरातील युवकांमधील क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर आणि कामे वेळेत पूर्ण करण्यावर आमचा भर आहे,” असे सिंगला यांनी सांगितले. या पाहणीवेळी महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण, अधीक्षक अभियंता योगेश कुलकर्णी,
कार्यकारी अभियंता उमेश मल्लावत, कनिष्ठ अभियंता चैतन्य भोर, जयदीप देशमुख तसेच प्रकल्प व्यवस्थापक आणि कंत्राटदार उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील फुटबॉलप्रेमी आणि युवा खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होऊन स्थानिक क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळणार आहे.






