पुणे | पीएमआरडीएची मेट्रोला पुन्हा नोटीस

पुणे, {प्रभात वृत्तसेवा] – मागील काही दिवसांत गणेशखिंड, पाषाण आणि बाणेर रस्त्यांसह आदी भागातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
परिणामी वाहनधारकांसह नागरिकांना अडचणी येत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रोचे काम करणाऱ्या पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडच्या (पीआयटीसीएमआरएल) कंपनीला पुन्हा नोटीस बजावली आहे. यामध्ये तातडीने रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना प्राधिकरणाने दिल्या आहेत.
पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडकडे संबंधित भागातील रस्त्याची बांधा वापरा हस्तांतरीत करा, या तत्त्वावर करारानुसार जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मात्र, काही दिवसांपासून गणेशखिंड, पाषाण, बाणेरसह कृषी महाविद्यालयाच्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
संबंधित रस्ते कायम वर्दळीचे असल्यामुळे या रस्त्यावरून शेकडो वाहनांची वर्दळ असते. खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना अतिशय हळुवारपणे खड्डे चुकवत त्यातून मार्ग काढावा लागत आहे. या रस्त्यांची संबंधित यंत्रणेने करारानुसार अपेक्षितरीत्या दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
मात्र, वारंवार सांगून देखील पीआयटीसीएमआरएल याकडे दुर्लक्ष करत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांच्या अडचणी लक्षात घेऊन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेड यांना नोटीस बजावली.
यात खराब रस्त्यांची तातडीने दि. २५ सप्टेंबरपर्यंत दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. माण- हिंजवडी ते शिवाजीनगर या भागातील रस्त्यांसंदर्भात देखील मागील १५ दिवसांपूर्वी संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती.





