पीएमपीचा स्वारगेट डेपो चकाचक

50 ट्रक स्क्रॅप माल काढला बाहेर
नव्याने रंगरंगोटी, गार्डन व ई-बसची प्रतिकृती तयार करण्यात येणार
पुणे – शहरात पीएमपीएमएलच्या स्वारगेट डेपोत घाणीचे साम्राज्य पसरले होते. मात्र, मागील आठवड्यात या डेपोतून सुमारे 50 ट्रक स्क्रॅप माल बाहेर काढत डेपो चकाचक केला आहे. आता डेपोत नव्याने रंगरंगोटी, गार्डन व ई-बसची प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे.
स्वारगेट डेपोतून शहराच्या विविध भागांत 134 बसचे संचलन होते. या माध्यमातून दैनंदिन सरासरी 11 लाख असून पासचे उत्पन्न वेगळे आहे. त्यामुळे, या ठिकाणी प्रवाशांची वर्दळ असते. परंतु, या डेपोत ऑईलचे डबे, खराब झालेले बसथांब्याचे भंगार, मातीचे ढिगारे असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच, या ठिकाणी वर्कशॉप असल्याने बस दुरुस्त करताना जागा अपुरी पडत होती. या ठिकाणी पीएमपीचा पेट्रोल पंप असल्याने अनेक अडथळे निर्माण झाले होते. परंतु, पीएमपीने संपूर्ण राडारोडा बाहेर काढत डेपो चकाचक केला आहे. त्यामुळे पीएमपी बस मोकळ्या जागेत लावल्या जात असून दुरुस्ती करणेही सोईचे ठरत आहे.
डेपोत जनजागृतीपर प्रतिकृती
सध्यस्थितीत स्वारगेट डेपोतील राडारोडा उचलून नेला आहे. आता या ठिकाणी नव्याने कामे सुरू झाली आहेत. डेपोत पर्यावरणपूक ई-बस व सीएनजी बसची प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे. योगा विषयक महत्त्व पटवून देत विविध आसनांची चित्रे भिंतीवर रेखाटण्यात येणार आहेत. याचबरोबर, आतील मोकळ्या जागेत गार्डन साकारले जाणार असल्याचे, स्वारगेट डेपो प्रशासनाने सांगितले आहे.
स्वारगेट डेपोत घाणीचे साम्राज्य असल्याने अनेक गैरसोईंचा सामना करावा लागत होता. त्यामुळे, नुकताच डेपोतून सुमारे 50 ट्रक भंगार माल उचलला आहे. आता डेपोत काही ठिकाणी रंगरंगोटी सुरू असून काही कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
– सतीश गाटे, स्वारगेट डेपो प्रमुख





