प्रभात वृत्तसेवा पाबळ – शिरूर तालुक्यातील ऐतिहासिक, धार्मिक व शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाबळ गावासाठी पीएमपीएल प्रशासनाने विशेष पर्यटन बस सेवा सुरू केली आहे. नुकतेच पहिल्या पर्यटन बसचे पाबळमध्ये आगमन झाले असून, यावेळी ग्रामस्थ, जैन ट्रस्ट आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी बसचे जंगी स्वागत केले. जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ढोल-लेझीम पथकाच्या तालावर मिरवणूक काढून पर्यटकांचे स्वागत केल्याने वातावरणात मोठा उत्साह दिसून आला. काही दिवसांपूर्वी पी एम पी एल चे पर्यटन समन्वयक नितीन गुरव आणि रूट सुपरवायझर दत्तात्रेय बडदे यांनी पाबळला भेट देऊन येथील प्रसिद्ध जैन मंदिर, मस्तानी कबर आणि विज्ञान आश्रम यांसारख्या प्रमुख ठिकाणांची पाहणी केली होती. या ऐतिहासिक वारशाची दखल घेऊन पर्यटकांसाठी ही विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे पुणे आणि परिसरातील पर्यटकांना पाबळचा समृद्ध वारसा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. याप्रसंगी बसचे चालक राजेंद्र गवळी, कृष्णा खंडागळे आणि वाहक तथा गाईड हडवळे व दत्तात्रय लोहोमकरे यांचा जैन ट्रस्टच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी सरपंच सोपान जाधव, माजी पंचायत समिती सदस्य किशोर रत्नपारखी, प्राचार्य डॉ. संजय घोडेकर, आप्पा पानसरे, प्राचार्य सुदामराव पिंगळे, संजय चौधरी, जयेश शहा,सतीशशेठ गांधी, सुनील राठोड, भूषण शहा आणि विज्ञान आश्रमचे कैलास जाधव, लक्ष्मण जाधव यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते.