प्रभात वृत्तसेवा रावेत – निगडी-साईनगर मार्गावरील पीएमपीएल बससेवेतील मर्यादित फेऱ्या आणि प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. विशेषतः सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ६ ते ८ या गर्दीच्या वेळात महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाला उभे राहून प्रवास करावा लागतो.साईनगर व मामुर्डी परिसरातून निगडीकडे जाणाऱ्या मिनी वातानुकूलित बस तासाच्या अंतराने धावत असल्याने सुरुवातीच्या थांब्यावरच बस खच्चून भरते. परिणामी पुढील थांब्यांवरील प्रवाशांना चढण्यासाठी जागा मिळत नाही. धक्काबुक्की, उभा प्रवास आणि वेळेची अडचण यामुळे अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. प्रवाशांनी सकाळी साईनगर आणि संध्याकाळी निगडी येथून अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. प्रशासनाने या मागणीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. “पीएमपीएमएल तर्फे लवकरच प्रत्येक आगारात नवीन बस दाखल होणार आहेत. प्रवासाचे मागणीनुसार बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येईल. लवकरच या मार्गावर जादा बस सोडण्यात येतील. तसेच प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात येईल.” -किशोर चौहान, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल, पुणे