पुणे -शहरात धावणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची सेवा आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत विस्तारणार आहे. पीएमआरडीए हद्दीतील प्रस्तावित बससेवेला नुकतीच मान्यता देण्यात आली. ग्रामीण भागातील 10 मार्गांवर सेवा सुरू होणार असून, 20 जूनपासून या बसेस टप्प्याटप्प्याने मार्गावर धावणार आहेत.
पीएमपीकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत बससेवा देण्यात येत होती. दोन्ही शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातून दररोज शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या हजारोंच्या घरात आहे.
त्यामुळे ग्रामीण भागात पीएमपीची सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. डिसेंबरपासून पीएमपीने जिल्ह्यातील सारोळा, कापूरव्होळ, भुगाव, यवत आदी सुमारे 12 मार्गांवर बससेवा सुरू केली होती.
यानंतर पीएमआरडीएच्या हद्दीतील विविध ग्रामपंचायतींकडूनदेखील गावांपर्यंत सेवा सुरुरू करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने पीएमआरडीए हद्दीतील विविध मार्गांचा सर्व्हेक्षण केले होते.
याबाबत सर्वप्रथम दै. प्रभात’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सुमारे 10 मार्गांवर सेवा सुरू करण्यात येणार आहे. या मार्गांवरील बससेवेला बुधवारी (16 जून) रोजी मान्यता देण्यात आली.
सध्या जिल्ह्यातील अनेक भागांत केवळ एसटी बसेस, प्रवासी वाहतूक करणारी जीप, रिक्षासारखी खासगी वाहने असे सार्वजनिक वाहतुकीचे मोजकेच पर्याय उपलब्ध होते.
मात्र, ग्रामीण भागातून थेट शहराच्या विविध भागांत जोडणारी बससेवा सुरू झाल्याने नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय, या मार्गांवरील प्रवासी संख्येत वाढ झाल्यास, उत्पन्न वाढण्यासाठी देखील मदत होणार आहे.
ग्रामीण भागांतील मार्गांचे सर्व्हेक्षण केले होते. या मार्गांवरील बसथांबे आणि त्याअनुषंगाने डेपोदेखील निश्चित करण्यात आले आहेत. साधारण 30 मिनिटांच्या वारंवारितेनुसार बसेसचे संचलन सुरू होणार आहे.
डॉ. राजेंद्र जगताप, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी