पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पीएमपीकडून यापुढे वाहकांची भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही महिन्यांत येणाऱ्या भाडेतत्त्वावरील ४०० बसचे चालक कंत्राटी पद्धतीने भरले जाणार आहेत. त्यामुळे पीएमपीने खासगीकरणाकडे आणखी एक पाऊस टाकल्याचे दिसत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीकडून सेवा दिली जाते. दररोज जवळपास १२ लाख प्रवासी पीएमपीने प्रवास करतात. त्यासाठी १६०० ते १७०० बस दररोज संचलनात असतात. मात्र, त्यातील ९०० ते १००० बस ठेकेदारामार्फत चालविल्या जातात. पीएमपीला मिळालेल्या उत्पन्नापैकी बहुतांश उत्पन्न ठेकेदारांच्या बसचे भाडे देण्यात जाते. या बसवरील चालक हे ठेकेदारामार्फत पुरविले जातात. मात्र, वाहक पीएमपीकडून पुरविले जातात. त्यामुळे दिवसभरात प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे जमा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. हे वाहक पीएमपीचे असल्यामुळे त्यांच्याकडून व्यवस्थित काम केले जाते. काही चूक झाल्यास नोकरी जाण्याची भीती असल्यामुळे काम व्यवस्थित पार पाडतात. मात्र, कंत्राटी कर्मचारी कसे काम करतील आणि प्रवाशांना व्यवस्थित सेवा देतील का, असा प्रश्न आहे. पीएमपी संचालक मंडळाची नुकतीच एक बैठक झाली. त्यामध्ये बसवरील वाहकदेखील कंत्राटी पद्धतीने भरण्याचा ठराव ठेवण्यात आला. त्याला मान्यता देण्यात आली. त्या वेळी पीएमपीच्या वाहकांना जास्त वेतन द्यावे लागते. मात्र, कंत्राटी वाहकांना कमी वेतन कमी द्यावे लागेल, असा या निर्णयामागील युक्तिवाद आहे. त्यानुसार आता नव्याने ठेकेदारामार्फत ४०० बस घेण्यात येणार आहे. या बस खरेदीची निविदा काढण्यात आली आहे. त्यामध्येच चालकाबरोबरच आता वाहक देखील ठेकेदारानेच पुरवावेत, असे सांगण्यात आले. त्यामुळे आता नव्याने येणाऱ्या ४०० बसवरील वाहक हे कंत्राटी पद्धतीने घेतलेले असतील. पीएमपीकडून यापुढे वाहक भरती केली न जाण्याची भीती आहे. वचक राहणार का? पीएमपीच्या ताफ्यातील निम्म्यापेक्षा जास्त बस ठेकेदारामार्फत चालविल्या जातात. त्या बसवरील कंत्राटी चालकांकडून सिग्नल तोडणे, प्रवाशांसोबत आरेरावी, थांब्यावर बस न थांबविणे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामध्ये पीएमपी प्रशासन त्या कंत्राटी चालकांवर काहीही कारवाई करू शकत नाही. केवळ ठेकेदारांना कारवाई करण्याची सूचना देऊ शकतात. त्यामुळे पीएमपीचा काहीही वचक राहात नाही. आता वाहकाबाबतही हीच परिस्थिती होऊ शकते. याबाबत पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी उत्तर दिले नाही.