PMC Ward Committee – मिनी महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक येत्या २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहेत. यासाठी येत्या १७ एप्रिल रोजी अर्ज मागविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या नगरसचिव योगीता भोसले यांनी दिली. दरम्यान, महापालिकेने केलेल्या क्षेत्रीय कार्यालय व प्रभाग समिती पुनर्रचनेत त्रुटी असल्याचा आरोप करत समिती रचनेला स्थगिती देण्याची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या मागणीनुसार तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने ७ एप्रिल रोजी पालिकेला दिले आहेत. यामुळे २१ एप्रिल रोजी होणाऱ्या क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती अध्यक्षांची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, हा अहवाल महापालिकेने शासनाकडे पाठविला असून, त्यावर शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नसल्याने महापालिका आयुक्तांनी या निवडणुकांचे आदेश प्रशासनास दिले आहेत. महापालिकेच्या १५ प्रभाग समित्या असून, नवीन रचनेनुसार १४ समित्यांवर भाजपचे अध्यक्ष, तर एका समितीवर काँग्रेसच्या अध्यक्षाला संधी मिळणार आहे.