PMC News : मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी करणे, पूरस्थितीवर नियंत्रण आणणे आणि नदीकाठाचा विकास साधण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा’चा विस्तार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सध्या सुरू असलेली कामे लक्षात घेता हा प्रकल्प मुंढवा ते मांजरी बुद्रुकपर्यंत विस्तार करण्याचा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक दादा कोद्रे यांनी स्थायी समितीत दिला होता. त्यास मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. सध्या मुळा नदी पुनरुज्जीवनाचे काम संगम ते बंडगार्डन (३.७० किमी) आणि बंडगार्डन ते मुंढवा पूल (५.३० किमी) या दोन टप्प्यांत सुरू आहे. या कामांमुळे नदीकाठाचे सुशोभीकरण आणि सांडपाणी व्यवस्थापनात सुधारणा होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुंढवा पुलानंतरचा मुंढवा ते मांजरी बुद्रुक हा भाग झपाट्याने विकसित होत असून, मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. या भागात नदीपात्रातील वाढते प्रदूषण, जलपर्णीची समस्या आणि पावसाळ्यातील पूरधोका लक्षात घेता पुनरुज्जीवनाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. संगम ते मुंढवा या टप्प्यावर सुरू असलेल्या कामाच्या धर्तीवरच पुढील टप्पा मांजरी बुद्रुकपर्यंत राबविल्यास नदीचे पात्र सलगपणे स्वच्छ ठेवणे शक्य होईल. तसेच, परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.