PMC News – महापालिकेच्या मालमत्तेची माहिती एकाच क्लिकवर मिळण्यासाठी डॅशबोर्ड विकसित करण्याचे नियोजन महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने केले आहे. महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी बुधवारी यासंदर्भात आढावा घेतला. महापालिकेच्या मालमत्ता जतन संरक्षण देखभाल विनियोग, संचलन करण्यासाठी सर्व मालमत्तेचे सर्वेक्षण करून एकत्रित डेटाबेस तयार करणे आवश्यक आहे, जेणेकरून सदर मालमत्तांचा प्रभावीपणे विनियोग करणे शक्य होणार आहे. असा यामागील हेतू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या आढावा बैठकीला उद्यानविभाग प्रमुख आणि सह महापालिका आयुक्त डॉ. अशोक घोरपडे, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपायुक्त तुषार बाबर, क्रीडा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत, परिमंडळ पाच चे उपायुक्त निखील मोरे, १५ क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. महापालिका अंकीत असलेली सर्व क्षेत्रीय कार्यालये, तसेच पुणे महापालिकेमधील विविध विभागांच्या ताब्यात असलेल्या मालमत्तांची २१ मुद्द्यांच्या आधारे माहिती सर्वांनी अद्ययावत करण्यात येणार आहे. यामध्ये मिळकतीचा वापर, क्षेत्रफळ सर्वे नंबर, भाडेपट्ट्याबाबतची स्थिती, करारनामा बाबतची स्थिती, अतिक्रमणविषयक स्थिती, तसेच अक्षांश आणि रेखांश इत्यादी माहिती संकलित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सदर मालमत्तांची एकत्रित माहिती प्रणाली विकसित करण्याच्या अनुषंगाने आणि भाडेपट्टा आणि महसूल व्यवस्थापन यामधील त्रुटी दूर करण्यासाठी इएमएएमएस प्रणाली लागू करण्याच्या अनुषंगाने, तसेच मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली मध्ये मूलभूत सुधारणा करण्यासाठी संगणक आज्ञावली (कम्प्युटर प्रोग्रॅम) विकसित करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. या प्रणालीमध्ये सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण जीआयएस मॅपिंग, डिजिटायझेशन, मूल्यांकन, सिंगल विंडो प्लॅटफॉर्म, पेमेंट गेटवे, सिस्टीम मॉनिटरिंग आणि रिपोर्टिंग करिता डॅशबोर्ड देखील विकसित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ही प्रणाली विकसित झाल्यानंतर सर्व मालमत्तांची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.