प्रभात वृत्तसेवा पुणे : मिळकतकर थकबाकीदारांसाठी महापालिकेने १५ नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून दोन आठवड्यांत ११ हजार १९१ मिळकतधारकांनी ६५ कोटी ४१ लाख ९५ हजारांचा मिळकतकर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. पालिकेच्या अपेक्षेनुसार हे उत्पन्न नसले, तरी नोव्हेंबरमधील अभय योजनेमुळे आतापर्यंत एकूण ७२ कोटी ८२ लाख ५५ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. शहरात सुमारे साडेसहा लाख मिळकतकर थकबाकीदार असून, त्यांची थकबाकी आणि त्यावरील दंडाची रक्कम मिळून थकबाकी १३ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दंडाच्या वाढत्या रकमेमुळे दर चार वर्षांनी ही थकबाकी दुपटीने वाढत आहे. त्यामुळे अभय योजना राबविली आहे. यापूर्वी महापालिकेने २०१६ नंतर चार वेळा अभय योजना राबविली होती. त्या योजनेतील लाभार्थींना यावेळी वगळण्यात आले आहे. त्यामुळे साडेचार लाख मिळकतधारकांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. या योजनेत थकबाकीवरील दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत देण्यात आली आहे. ही योजना १५ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे. या माध्यमातून पालिकेस साडेचारशे कोटींची उत्पन्न अपेक्षित आहे. त्या तुलनेत पालिकेला प्रतिसाद कमी मिळाल्याचे दिसते. मिळकतकर विभागास २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३ हजार कोटींचे उद्दीष्ट दिले असून आतापर्यंत १८०० कोटींचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. सरसकट लाभाची मागणी पालिकेने २०१६ नंतरच्या अभय योजनेत लाभ घेतलेल्या थकबाकीदारांना यावेळी वगळले आहे. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मिळकतधारकांना वगळू नये आणि सर्वांनाच सरसकट याचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे. यासाठी प्रशासनाकडे राजकीय नेत्यांनी पत्र दिले असून, त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रशासनाने थकबाकीदारांशी संपर्क साधून अभय योजनेची माहिती देणे आणि जनजागृती मोहीम राबविणे सुरू केले आहे.