प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी सणांच्या सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्यांना त्या दिवशी दीडपट वेतन देण्यात येणार आहे. कामगार कल्याण विभागाच्या प्रस्तावाला स्थायी समिती, मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. पालिका दरवर्षाच्या सुरूवातीला अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय इतरांच्या विभागनिहाय सुट्ट्यांचे धोरण निश्चित करते. यावर्षीच्या धोरणांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी मान्य सणांच्या दिवशी काम केल्यास दीडपट वेतनाचा लाभ मिळणार आहे. दरवर्षी शासन अधिसूचित करते त्या १२ दिवसांच्या सुट्ट्या वगळल्या आहेत. तसेच २०२५ मध्ये शासकीय सुट्ट्या २४ दिलेल्या आहेत. यापूर्वी महापालिकेकडे याबाबत कोणतेही धोरण नव्हते.काही महिन्यांपूर्वी राज्य सफाई कर्मचारी आयोगाबरोबरच्या बैठकीत शासकीय सुट्ट्या, शनिवारची सुट्टी आणि त्याऐवजी मोबदल्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र, शासनाच्या धोरणानुसार सफाई कामगारांना ५ दिवसांचा आठवडा लागू करता येत नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यावर निर्णय घेण्यासाठी सणांच्या सुट्टीच्या दिवशी काम केल्यास आर्थिक मोबदल्याचा पर्याय पालिकेने निवडला आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना दीडपट वेतन दिल्यास महापालिकेवर वार्षिक ३.५ ते ४ कोटींचा अतिरिक्त भार येईल. त्यामुळे या निर्णयासाठी मुख्य सभेची मंजुरी आवश्यक होती. कामगार कल्याण विभागाच्या प्रस्तावाला आयुक्त नवलकिशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर मान्यता दिली आहे. या निर्णयाचा लाभ पालिकेच्या साडेचार ते पाच हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.