PMC News – उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या कार्यालयात शुक्रवारी संध्याकाळी दोन कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यामुळे, काही काळ त्यांच्या कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर उपस्थित दोन कार्यकर्त्यांना शांत केले तर नंतर उपमहापौरांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत वादावर पडदा टाकला. या वादानंतर महापालिकेने मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करत शिवाजीनगर पोलिसांनाही या घटनेची माहिती देत परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती कार्यक्रमासाठी पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पालिकेचा एकच मंडप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना कार्यकर्त्यांनी बॅनर, लहान स्वागत मंडप लावले आहेत. आंबेडकर पुतळ्याजवळील एक लहान मंडप काढल्याने ताडीवाला रस्ता परिसरात कार्यकर्ते नाराज झाले. याबाबत नाराज कार्यकर्ते उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडे तक्रार घेऊन आले होते. त्यावेळी वाडेकर यांच्या दालनात इतर कार्यकर्तेही जमले होते. त्यातील एका कार्यकर्त्याने तुम्ही कशाला वाढीव करायला आलात ? असा सवाल केला. यावरून दोन्ही गटात जोरदार वादावादी झाली. खुर्च्या उचलून अंगावर टाकत एकमेकांची कपडेही फाडली. हा प्रकार उपमहापौरांच्या समोरच झाला. त्यामुळे अचानक झालेल्या गोंधळाने मोठी गर्दी झाली. काही काळ तणावाचे वातावरणही होते. “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळचा एक मंडप महापालिकेने काढल्याने काही कार्यकर्ते ही तक्रार घेऊन माझ्याकडे आले होते. माझ्या दालनात बसलेल्या एकाने त्यांना काहीतरी बोलल्याने त्यांच्यात भांडणे झाली. यापूर्वीचे काहीतरी कारण वादाला कारणीभूत असू शकते. मात्र, माझ्याशी कोणताही वाद झालेला नाही. दोन्ही कार्यकर्त्यांची आपण समजूत काढलेली आहे.” – परशुराम वाडेकर, उपमहापौर