PMC News – शहर- उपनगरांतील पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंडातून पुणे महापालिकेला ७१० कोटींचा निधी मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मंगळवारी दिली. पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक आणि रस्त्यासाठी हा प्रस्ताव असून येत्या दोन दिवसांत त्यावर निर्णय अपेक्षित आहे. राज्य सरकारने पुण्यासह अन्य काही शहरांतील प्रकल्पांसाठी ३० हजार कोटींचे प्रस्ताव पाठवले आहेत. त्यामध्ये पुण्यासह नाशिक, पिंपरी-चिंचवड यांचाही समावेश आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने तीन हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. पुणे महापालिकेने सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी निधीची मागणी केली होती. या निधीतून वाघोली, मांजरी, हंडेवाडी-औताडेवाडी, शेवाळवाडी, बावधन, वडाचीवाडी आणि होळकरवाडीमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (एसटीपी) उभारण्याचे नियोजन असल्याचे भिमाले यांनी सांगितले. अमृत योजनेत सुरू असलेली ३५० कोटींची कामे सुरू राहणार आहेत. सोमवारी केंद्राने दिलेल्या १२९० कोटींच्या निधीत आणखी ७१० कोटींच्या निधीची भर पडेल. पुढील टप्प्यात रस्ते विकासाची कामे हाती घेतली जाणार असून, त्यासाठीही अतिरिक्त निधीचा प्रस्ताव केंद्राकडे देण्यात येणार आहे. या सगळ्यांचा विचार केल्यास शहराला तीन हजार कोटींचा निधी उपलब्ध होईल, असे भिमाले यांनी स्पष्ट केले.