PMC News – महापालिकेत गेली चार वर्षे प्रशासकीय राजवट होती. या काळात झालेल्या कामांबाबत नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना आपली भूमिका मांडायची असते. मात्र, सत्ताधारी भाजपकडून विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी शुक्रवारी मुख्य सभेत दोन वेळा सभात्याग केला. सभागृह नेते हे संपूर्ण सभागृहाचे असताना त्यांच्याकडून हुकूमशाही पद्धतीने कामकाज चालविले जात असल्याने सत्ताधारी भाजपने याचा गांभीर्याने विचार करावा, अशी टीका विरोधी पक्षनेते ऍड. नीलेश निकम यांनी सभात्यागानंतर माध्यमांशी बोलताना केली. या वेळी नगरसेवक दत्ता बहिरट उपस्थित होते. दिवसभरात दुपारी काँग्रेसच्या सदस्यांनी प्रथम सभात्याग केला. त्यानंतर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत सभा तहकूब करण्याची मागणी करत पुन्हा सभात्याग केला. काय आहे विरोधकांचा आक्षेप महापालिकेची एप्रिल महिन्याची मुख्य सभा शुक्रवारी सकाळी ११ वाजता नियोजित होती. या सभेसाठी सुमारे ५१ नगरसेवकांनी प्रश्न विचारले होते. त्याची लेखी उत्तरे प्रशासनाकडून देण्यात आली असली, तरी अनेक नगरसेवकांना ही उत्तरे चुकीची असल्याने अधिकाऱ्यांकडून खुलासा अपेक्षित होता. मात्र, मुख्य सभा सुरू झाल्यानंतर केवळ दोनच प्रश्नांवर चर्चा झाली. त्यानंतर पुढील प्रश्नांवरही चर्चा सुरू राहावी, यासाठी एप्रिल महिन्याची कार्यपत्रिका सुरू ठेवावी, अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी होती. पुणे महापालिका सभागृह. यासाठी त्यांनी महापौरांकडेही विनंती केली होती. मात्र, सभा सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्याची कार्यपत्रिका संपविण्याची भूमिका भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी घेतली. त्यामुळे सभेतील विषय मान्यतेसाठी पुकारल्यानंतर नगरसेवकांना, तसेच विरोधी पक्षांच्या गटनेत्यांनाही त्या विषयावर बोलू देण्यास नकार देण्यात आला. सभा तहकुबीचा प्रस्ताव फेटाळला या प्रकारामुळे नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रश्नोत्तरांचा तास पुढेही चालू ठेवावा, अशी मागणी करत सभा तहकूब करण्याची भूमिका घेतली. मात्र, बिडकर यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या निकम यांनी थेट सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडला. बिडकर यांनी त्याला विरोध केल्याने त्यावर मतदान घेण्यात आले. मात्र, मतदान होण्यापूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहाचे कामकाज चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे सांगत सभात्याग केला. त्यानंतर ९५ विरुद्ध शून्य मतांनी सभा तहकुबीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.