प्रभात वृत्तसेवा पुणे : शहरातील जाहिरात फलका (होर्डिंग्ज)च्या परवानगी शुल्काच्या दरवाढीसाठी महापालिकेने डिसेंबर २०२२ मध्ये मंजूर केलेला ठराव नगरविकास मंत्रालयाने रद्द केला आहे. जाहिरात फलकांसाठी महापालिकेने किती व कसे शुल्क आकारावे यासाठी मे २०२२ मध्ये नियमावली तयार केली आहे. या नियमावलीतील तरतुदींशी ही दरवाढ सुसंगत नसल्याचे सांगत शासनाने हा ठराव रद्द करत पालिकेस धक्का दिला आहे. दरम्यान, या दरवाढीच्या विरोधात पुणे आऊटडोर असोसिएशनने शासनाकडे तक्रार केली असून मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिकाही दाखल केली आहे. त्यानुसार शासनाने ही दरवाढ रद्द केली आहे. दरवर्षी १० टक्के वाढीस मान्यता महापालिका २०१३ मध्ये होर्डिगसाठीच्या २२२ रूपये प्रती चौरसफूट दराने परवाना शुल्क आकारले जात होते. त्यानंतर २०१८ मध्ये ४८० रूपये दरवाढ प्रस्तावित केली होती. त्यावर प्रशासनाने माघार घेतली. मात्र, प्रशासन चुकीच्या पद्धतीने आकारणी करत असल्याने पुणे आऊटडोर असोसिएशनने त्याला विरोध करत न्यायालयात याचिका केली. त्यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विचार करून याचिकेचा निकाल लागेपर्यंत १११ रूपये दराने शुल्क आकारणीच्या सूचना केल्या.यानंतर पुन्हा न्यायालयाच्या सुनावणीचा आधार घेत महापालिकेने डिसेंबर २०२२ मध्ये दरवाढीचा प्रस्ताव ठेवला. त्यात, जाहिरात फलकांसाठी २०२३ पासून पूर्वलक्षी दराने दरवर्षी १० टक्के दरवाढीस मान्यता दिली. त्यामुळे २०१३ पासून ते २०२२-२३ पर्यंत ही दरवाढ तब्बल ५७६ रूपये प्रती चौरसफूटांपर्यंत गेली. यामुळे असोसिएशनने पुन्हा दरवाढीच्या विरोधात रिट याचिका दाखल केली. त्या सुनावणीच्या अनुषंगाने शासनाने १११ रूपयांप्रमाणेच महापालिकेने शुल्क आकारावे, असे आदेश दिले.मात्र,पालिकेने या आदेशावर आपली भूमिका नगरविकास विभागाकडे मांडत ठराव योग्य असल्याचे कळविले. त्यानंतर आता पुन्हा शासनाने १८ नोव्हेंबर रोजी आदेश काढत पालिकेचा डिसेंबर २०२२ च्या दरवाढीचा ठराव रद्द केला आहे. त्यामुळे पालिकेस चांगलाच धक्का बसला आहे. “शासनाच्या धोरणानुसार परवाना शुल्कात वाढ असावी ही आमची मागणी होती. शासनाने २०२२ मध्ये धोरण निश्चित केले असून त्यात परवाना देण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या वाजवी मर्यादेपेक्षा जास्त शुल्क आकारू नये असे स्पष्ट केले आहे. आम्ही महापालिकेला सहकार्य करण्यास तयार आहोत. त्यावर प्रशासनाने एकत्र येऊन तोडगा काढावा हीच आमची अपेक्षा आहे.” – बाळासाहेब गांजवे (अध्यक्ष, पुणे आऊटडोर असोसिएशन)