PMC News : बेसुमार वाहनांमुळे वाढणारे वायू प्रदूषण, काॅक्रिटीकरणाच्या छंदामुळे घसरलेले हरित आच्छादन, ४३ सेल्सियसचा आकडा पार करणारे शहराचे तापमान, अशा स्थितीतही पालिकेने बांधकाम व्यावसायिकांना रेड कार्पेट अंथरत आहे. तुम्ही फक्त अर्ज करा अन् पाहिजे तेवढी झाडे तोडा अशी भूमिका बांधकाम व्यवसायाबाबत पालिकेने घेतल्याचे दिसते. झाडे तोडल्यानंतर बदल्यात किती पुनर्रोपण केले, किती जगली, नवी झाडे किती लावली, किती जगली यांचा कोणतीही विचारणा पालिका करणार नाही, असे दिसते. गेल्या चार वर्षांत बांधकाम व्यावसायिकांना विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीच्या परवानग्या दिल्या आहेत. एकूण ८ हजार ६७४ झाडे काढण्यास परवानगी दिली असून त्याबदल्यात ६ हजार ३२१ झाडांच्या पुनर्रोपणास मंजुरी दिली. पुणे महापालिका. मात्र, काढलेल्या झाडांच्या मोबदल्यात किती झाडे लावली, तसेच पुनर्रोपण केलेली किती झाडे जगली याची नोंदच उद्यान विभागाकडे नाही. त्यामुळे पर्यावरणाबाबत महापालिका किती गंभीर आहे हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. नगरसेवक देवेंद्र वडके यांनी मे महिन्याच्या मुख्यसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाच्या उत्तरातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. काय म्हणतेय प्रशासन उद्यान विभागाच्या माहितीनुसार, २ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या आदेशानुसार स्वतंत्र वृक्ष प्राधिकरणाची स्थापना झाली. त्यानंतर १६ एप्रिल २०१८ पासून क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांकडे वृक्ष अधिकाऱ्यांची जबाबदारी सोपविण्यात आली. शहरात एकूण ८ हजार ६७४ झाडे पूर्णपणे काढण्यास परवानगी दिली. ६ हजार ३२१ झाडांच्या पुनर्रोपणास मंजुरी दिली. प्रत्यक्षात किती नवीन झाडे लावण्यात आली याचा एकत्रित अहवाल प्रशासनाकडे नाही. १५ पैकी वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात ३२१६ आणि वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात ९१६ नवीन झाडे लावली आहेत.