प्रभात वृत्तसेवा पुणे : तीन वर्षे निवडणूका न झाल्याने महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. या कालावधीत नगरसेवक नसल्याने नागरिकांना आपल्या अडचणी सोडविण्य़ासाठी महापालिकेत अनेकदा हेलपाटे घालावे लागले. ही बाब लक्षात घेवून महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी राबविलेला एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह हा उपक्रम नागरिकांच्या पसंतीस उतरला आहे. या सेवेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या यशस्वीरित्या सोडविण्यात आल्या आहेत. महापालिका अस्तित्त्वात नसतानाही गणेश बिडकर यांनी सक्षम यंत्रणेद्वारे हा उपक्रम यशस्वी पणे राबविल्याने प्रभाग २४ मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.याबाबत बोलताना बिडकर म्हणाले की, प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यावर भर दिला. पाणीपुरवठा, बांधकाम, मलनिःसारण, देखभाल-दुरुस्ती, पथ विभाग, अग्निशमन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, विद्युत व वृक्ष प्राधिकरण, आरोग्य, समाजविकास आणि सांस्कृतिक विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना वारंवार अधिकाऱ्यांकडे जावे लागत असल्याची अडचण लक्षात घेऊन या उपक्रमाची आखणी करण्यात आली.त्यामुळे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तातडीनं सोडविण्यात यश आले. “नगरसेवक हा प्रशासन आणि नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा असतो. नागरिकांना जलद आणि सुलभ सेवा मिळावी, या उद्देशातूनच एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह हा उपक्रम राबवला.” – गणेश बिडकर, माजी सभागृह नेते, पुणे महापालिका