प्रभात वृत्तसेवा पुणे – पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत आघाडी करण्यास तयार असल्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडूनही दोन्ही राष्ट्रवादी सोबत जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यात मनसे आणि शिवसेना काँग्रेस सोबत जाण्यास तयार असल्याचे पक्षाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी स्पष्ट केले. पुढील दोन दिवसांत मनसे आणि शिवसेनेच्या जागा निश्चित झाल्यानंतर लगेचच हा प्रस्ताव काँग्रेसला दिला जाणार असून शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढतील तर जागा वाटपात शिवसेना आणि मनसे एकच असणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे जागा वाटपात कोणताही तिढा निर्माण न होता रविवारपर्यंत जागा वाटप, पक्षाच्या याद्या जाहीर झालेल्या असतील असेही थरकुडे यांनी स्पष्ट केले. मनसे आणि शिवसेनेत निवडून आलेल्या जागा तसेच दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षाच्या जागांबाबत चर्चा सुरू असून ही चर्चा अंतीम टप्प्यात असल्याचेही ते म्हणाले.