प्रभात वृत्तसेवा पुणे – उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरचे चार दिवस शिल्लक असल्याने भाजपकडून पुण्यातील उमेदवारांची यादी अंतीम करण्यासाठी गुरूवारी रात्री मुंबईत बैठकांचे सत्र सुरू होते. बुधवारी पुण्यात प्रत्येक विधानसभानिहाय उमेदवारांचा प्राधान्यक्रम निश्चित झाल्यानंतर ही यादी घेऊन गुरूवारीही बैठका झाल्या. त्यासाठी शहरातील पक्षाच्या आमदारांनाही स्वतंत्रपणे बोलविण्यात आले होते. त्यामुळे,पहिल्या यादीवर गुरूवारी रात्रीच शिक्कामोर्तब करून आज ती जाहीर केली जाणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले. तर, पहिल्या यादीत सुमारे ६० ते ६२ नावे असतील, असेही सांगण्यात येत आहे.महापालिका निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच भाजपकडून उमेदवारांना अर्ज वाटप करण्यात आले होते तसेच उमेदवारांच्या मुलाखतीही झालेल्या होत्या. त्यानंतर भाजपकडून प्राथमिक यादी निश्चित करण्यासाठी बैठका सुरू होत्या. तसेच, महायुतीमधील घटक पक्षांसोबत चर्चाही सुरू होती. मात्र, आता युतीचे जागा वाटप अंतीम होण्यासाठी आणखी एक दोन दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता असल्याने पक्षाकडून तो पर्यंत वाट न पाहता युतीच्या जागा वाटपात भाजप, शिवसेना तसेच रिपाई सोबत कोणतेही वाद अथवा दावा नसलेल्या भाजपच्या जागांवरील उमेदवार जाहीर केले जाणार आहेत तसेच इतर काही पक्षातील प्रवेशही आयत्या वेळी घेतले जाणार आहेत.