पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपचे उमेदवार कुणाल शैलेश टिळक यांनी सोमवारी बुधवार पेठ परिसरात घरोघरी संपर्क अभियान राबविले. या अभियानात प्रभागातील अन्य उमेदवारही सहभागी झाले होते. या वेळी महिला व बालकांशी संबंधित प्रश्नांवर कुणाल टिळक यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. संवादादरम्यान महिलांनी सुरक्षिततेचे प्रश्न, आरोग्य सुविधा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, तसेच बालकांसाठी सुरक्षित खेळाची ठिकाणे आणि शिक्षणाशी संबंधित अडचणी मांडल्या. या समस्या केवळ सामाजिकच नव्हे, तर नागरी जीवनाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून त्या सोडविण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याचे टिळक यांनी या वेळी या परिसरातील महिलांशी बोलताना नमूद केले. महिला सक्षमीकरण, आरोग्य तपासणी उपक्रम आणि बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही प्रभागाच्या विकासाची मूलभूत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक गरजांनुसार उपाययोजना राबवून महिलांना व बालकांना सुरक्षित, सक्षम वातावरण देण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासनही दिले. या वेळी या भागातील महिला व बालकल्याणासारख्या संवेदनशील विषयांवर थेट संवाद साधून प्रश्न समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधण्याची भूमिका, यामुळे कुणाल टिळक यांच्या प्रचार दौऱ्यास नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.