प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीतील मतदान प्रक्रियेला रविवारी गोंधळ, तांत्रिक अडथळे, तसेच गैरव्यवहारांच्या आरोपांची साथ लाभली. सकाळच्या सत्रात अनेक केंद्रांवर मतदारांचा उत्साह कमी दिसला; मात्र संध्याकाळनंतर अनेक प्रभागांमध्ये मतदान केंद्राबाहेर लांबलचक रांगा लागल्या. दिवसभरात तब्बल २७ मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ७६ मशिन बदलावी लागली. ईव्हीएमच्या मांडणीत बदल, डेपो मतपत्रिका आणि प्रत्यक्ष मशिनमधील विसंगतीमुळेही मतदार संभ्रमात पडले. अनेक ठिकाणी उमेदवारांची संख्या जास्त असल्याने योग्य बटन शोधतांना मतदारांना वेळ लागत होता. कसबा, कोथरूड आणि शिवाजीनगर मतदारसंघांत मतदारांची नावे याद्यांतून गायब असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवल्या गेल्या. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागांत असल्याने अनेकांना वेगवेगळ्या केंद्रांवर फेर्या माराव्या लागल्या. शासकीय वोटर स्लिप न मिळाल्याने नाव शोधण्यासाठी आणि स्लिप घेण्यासाठी राजकीय बुथवरही गर्दी झाली. काही प्रभागांत बोगस मतदानाचे प्रकार घडल्याचा आरोप विरोधकांनी केला. मतदारांऐवजी इतरांनी मतदान केल्याच्या तक्रारींसोबतच बाणेर आणि कोंढवा भागात बाहेरून मतदार आणल्याचीही चर्चा झाली. शहरातील विविध भागांत पैशांचे वाटप, मतदारांचे उमेदवारांच्या कार्यालयात फेऱ्या, येवलेवाडी परिसरात १ लाखांची रोकड जप्त होणे, अशा प्रकरणांवरून पोलीस यंत्रणेला धावपळ करावी लागली. धायरीत मतदानाची शाई केमिकलने पुसण्याचा प्रयत्न, तसेच मतदान केंद्राजवळ लागलेल्या आगीमुळे वीजपुरवठा खंडित होणे, या प्रकारांनीही खळबळ उडाली. काही केंद्रांवर मतदान केंद्राच्या आतच उमेदवारांचा प्रचार सुरू असल्याच्या तक्रारी झाल्या. नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची पोलिसांशी हुज्जत, मोबाइल नेण्यावरून मतदार–पोलीस वादही पाहायला मिळाले. बुरखा (बमुर्डा) घालून आलेल्या एका महिला मतदारास मतदानास मनाई केल्याचा प्रकार प्रभाग १ मध्ये घडला, तेथे उमेदवाराच्या मध्यस्थीने तो वाद निवळला. दरम्यान, मतदान प्रक्रियेत उशीर होत असूनही ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला; मात्र युवकांचा प्रतिसाद तुलनेने कमी असल्याचे चित्र दिसले. दिव्यांग मतदारांसाठी अनेक मतदान केंद्रांवर व्हीलचेअरची सोय करण्यात आली. शहरातील विविध भागांत सेलिब्रेटी तसेच प्रमुख राजकीय नेत्यांनी मतदान करून लोकशाही सणात सहभागी होण्याचे आवाहन केले.