पुणे – पुण्यात सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर करण्याऐवजी थेट एबी फाॅर्म देण्यात आल्याने भाजपसह सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी राजकीय पक्षांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. गुरुवारी दिवसभरात पुण्यात एकूण ६७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत, तर अद्यापही शहरात १६५ जागांसाठी २५२३ उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणात असून, आज अर्ज माघारी घेण्यासाठी शुक्रवारी (दि. २) दुपारी तीनपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. रात्री उशिरापर्यंत महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून हे काम सुरू असल्याने निश्चित माहिती मिळू शकली नाही. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीसाठी शहरात मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यकर्ते इच्छुक असल्याने या निवडणुकीसाठी तब्बल १३ हजार उमेदवारी अर्जांची विक्री झाली होती. त्यातून सुमारे ३ हजार ५२ अर्ज दाखल झाले होते, तर छाननीत २८६ अवैध ठरले. छाननीनंतर दुबार भरलेले अर्ज वगळण्यात आले असून, एकूण २५२३ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी शहरात सुमारे ६७ उमेदवारांनी माघार घेतली आहेत. त्यामुळे अद्यापही मोठ्या प्रमाणात उमेदवार महापालिकेच्या रिंगणात आहेत. दिवसभर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून पक्षातील बंडखोरांशी संपर्क साधून त्यांना अर्ज माघारी घेण्याची विनंती केली जात होती. नेत्यांकडून फोन आणि भेटी अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने गुरुवारी दिवसभर नेत्यांकडून बंडखोरांना फोन सुरू होते, तसेच काही महत्त्वाच्या ठिकाणी थेट नाराजांची भेट घेत त्यांची मनधरणी केली जात असल्याचे दिसून आले. प्रामुख्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, तसेच मनसचे जागा वाटप निश्चित झाल्यानंतरही तीनही पक्षांकडून ५० पेक्षा अधिक एबी फाॅर्म देण्यात आले आहेत. दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेत जागावाटप निश्चित होण्या आधीच भाजपने सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. शिवसेनेकडूनही सुमारे १५० जागांसाठी एबी फाॅर्म दिले आहेत. त्यामुळे महायुतीचा निर्णय अंतिम झाल्यास शिवसेनेला तब्बल सव्वाशेहून अधिक उमेदवारांचे अर्ज माघारी घ्यावे लागण्याची चिन्हे आहेत.