प्रभात वृत्तसेवा पुणे – भाजपसह सर्वच राजकीय पक्षात महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय पक्षांनी उमेदवार यादी जाहीर न करता बंडखोरी टाळण्यासाठी थेट अधिकृत उमेदवारांना एबी फाॅर्म दिले आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून सोशल मीडियावर पक्षाच्या विरोधात जोरदार टिका सुरू केली आहे. त्यामुळे, आता नाराजांना रोखण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू असून काही ठिकाणी पक्षाचे नेते थेट उमेदवारांना संपर्क साधत आहेत. तर, अनेकांनी नेत्यांचे फोन चक्क ब्लाॅक केल्याने या इच्छुकांना शोधण्यासाठी तिकिट मिळालेल्या उमेदवारांची धावपळ सुरू असल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतरही बंडखोर ऐकण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता पक्षाचे नेते या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. अर्ज माघारी घेण्यासाठी आज ( शुक्रवार) दुपारी तीन पर्यंतची मुदत असणार आहे. फोन नाॅट रिचेबल… महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार होते तर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे एकत्र लढणार होते.तर प्रत्येक पक्षाने आघाडीत झालेल्या जागा वाटपा पेक्षा अधिक एबी फाॅर्म दिले आहेत. तर अर्ज भरण्याची मुदत ३० डिसेंबरला संपल्यानंतर आता माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत जागा वाटपांची चर्चा सुरू ठेवून इतर उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास सांगितले जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अनेक इच्छुकांनी नवीन वर्षाला बाहेर अथवा देवदर्शनाला जात आपले फोन बंद ठेवले आहेत तर कार्यकर्ते आणि कुटुंबातील सदस्य उमेदवारांशी संपर्क होत नसल्याचे सांगत असून अनेकांकडून थेट पक्षाच्या नेत्यांना जाब विचारत नकार दिला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मनधरणीसाठी उमेदवारही दारी… उमेदवारी न मिळालेल्या नाराज पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत, त्यांची मनधरणी करण्यासाठी गुरूवारी दिवसभर उमेदवार या अपक्षांची भेट घेत आहेत. पक्षाने संधी दिल्याचे सांगत आपल्या बद्दल काही रोष ठेऊ नये तसेच प्रचारात मदत करण्याची विनंती केली जात आहे. तर काही उमेदवारांकडून नाराजांना पक्षांच्या नेत्यांना फोन लावून दिले जात असून पक्षाच्या शहर पातळीवरील वेगवेगळ्या समिती तसेच महापालिकेत क्षेत्रीय कार्यालयच्या स्तरावर प्रभागता स्विकृत सदस्यपदी नियुक्ती देण्याचे आश्वासन दिले जात असून अर्ज माघारी घेण्यासाठी विनवणी केली जात आहे.