हडपसर – जनतेच्या प्रश्नांसाठी गेली ३५ वर्षे आम्ही झगडत असून माझ्या प्रभागातील महमंदवाडी गाव व त्यालगतच्या बारा वाड्यावस्त्यांचा पाणीप्रश्न अत्यंत बिकट असून रात्री-आपरात्री नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, यावर आम्ही पाणीपुरवठा सुरळीत करणार आहोत. मागील २० वर्ष नगरसेवकांनी ही कामे केलेली नाहीत, असे भाजपचे उमेदवार जीवन बापू जाधव यांनी सांगितले. महमदवाडी-उंड्री प्रभाग ४१ मध्ये भाजपचे उमेदवार जीवन बाप्पू जाधव, अतुल नारायण तरवडे, स्नेहल गणपत दगडे, प्राची आशिष आल्हाट या उमेदवारांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या यावेळी जाधव यांनी सदर बाब स्पष्ट केली. १९६१ साली बारावाड्यांच्या भागातून जाणारा कालवा काही कारणास्तव होऊ शकला नाही. मात्र, निवडून आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही हे काम पूर्ण करणार आहे. यासाठी मुख्यमंत्री यांना २५ हजार नागरिकांनी सही केलेले पत्र भाजप उमेदवार यांनी दिलेले आहे. हे कालव्याचे पाणी कात्रज, पिसाळी, उंड्री, हांडेवाडी, औतडवाडी, वडाचीवाडी येथील तलावात सोडून जलशुद्धीकरण करून या भागातील नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे, यामुळे या भागाला मुबलक पाणीपुरवठा होईल. दरम्यान, उमेदवारांनी चिंतामणी नगर, श्रीराम चौक, सिम्पिलसिटी हांडेवाडी रोड वडाची वाडी, होळकरवाडी, औतडवाडी, उंड्री, पिसोळी, महमंदवाडी, तरवडेवस्ती, कानडे वस्ती परिसरात नागरिकांच्या घरोघरी भेटी घेत संवाद साधला.