पुणे : प्रभाग क्रमांक २१ (मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मतदारांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला. या प्रचार फेरीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उमेदवारांशी थेट संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार सुगत (श्रीशैल) चंद्रशेखर दसाडे, शोभा संतोष नांगरे, श्वेता संग्राम होनर-कामठे आणि बाळासाहेब अटल उपस्थित होते. या प्रचार दौऱ्याची सुरुवात संत नामदेव शाळेजवळून झाली. त्यानंतर जमावे-एकदिल मंडळ, अंजुमन गल्ली, एकता मित्र मंडळ, दिग्विजय मित्र मंडळ, शब्बीर गल्ली, विकास मोरे गल्ली, टी. एम. व्ही. सर्कल विद्यापीठ परिसर तसेच जिजामाता रिक्षा स्टँड अशा विविध ठिकाणी उमेदवारांनी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रहिवाशांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी बोलताना उमेदवारांनी प्रभाग क्रमांक २१ हा शहरातील एक आदर्श प्रभाग म्हणून विकसित करून दाखविण्याचा ठाम विश्वास मतदारांना दिला. या प्रभागात व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर असून त्यांच्या व्यवसायवाढीसाठी आवश्यक सर्व सुविधा, नियोजनबद्ध विकास आणि पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्यात येईल. त्याअंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग व्यवस्था तसेच नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उभारण्यात येतील, असेही उमेदवारांनी स्पष्ट केले. या प्रचार फेरीदरम्यान नागरिकांनी आपुलकीने उमेदवारांचे स्वागत करत त्यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त केला. आगामी काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कटिबद्ध असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.