प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी निवडणुकांपुरतीच एकत्र न राहता, आघाडीत समाविष्ट होणारे पक्ष निवडणुकीनंतरही एकत्र राहतील. कोणताही पक्ष सत्तेसाठी अथवा इतर कोणत्याही कारणांसाठी महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही, असा लेखी करार करण्याचा निर्णय सोमवारी पुण्यात घेण्यात आला. पुण्यात भाजपला महापालिकेच्या सत्तेपासून रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे, ही भूमिका घेत काँग्रेस भवन येथे काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहरातील सर्व प्रमुख नेत्यांची पहिली एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत या निर्णयावर चर्चा करण्यात आली, तसेच तीनही पक्षांनी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर सहमती दर्शविली आहे. इतर समविचारी पक्ष आघाडीत येण्यास तयार असल्यास त्यांनाही सोबत घेण्यास तीनही पक्षांनी सहमती दर्शविली आहे. या बैठकीत प्रामुख्याने आघाडीसाठी अडचणीच्या ठरणाऱ्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आजी- माजी आमदार उपस्थित होते. वादाच्या मुद्द्यांवर चर्चा या बैठकीत आघाडीत वाद निर्माण करू शकणाऱ्या मुद्द्यांवर सर्वप्रथम चर्चा करण्यात आली. ही आघाडी केवळ निवडणुकांपुरती न राहता निवडणुकीनंतरही कायम राहील. सत्तेसाठी आघाडीतील कोणताही पक्ष आघाडी सोडणार नाही. जागावाटपात ज्या पक्षाला जागा मिळेल, त्या पक्षाच्या विरोधात आघाडीतील इतर कोणत्याही पक्षाने बंडखोर उमेदवार देऊ नये. बंडखोर उमेदवारांना थांबविण्यास सांगावे आणि त्यांना इतर कोणत्याही पक्षाने एबी फॉर्म देऊ नये. आघाडी संपूर्ण शहरासाठी असेल, कुठेही मैत्रीपूर्ण लढत असणार नाही. एकमेकांच्या पक्षातील इच्छुक फोडायचे नाहीत, तसेच त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये. सक्षम उमेदवारामुळे जागावाटपात अडचण आल्यास एकत्र बसूनच निर्णय घ्यायचा. समविचारी पक्ष सोबत येण्यास तयार असल्यास त्यांना आघाडीत प्रवेश द्यायचा, असे निर्णय या वेळी घेतल्याचे सांगण्यात आले.