प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात आघाडी झाली असून, शंभर जागांवर सहमती झाली आहे. काँग्रेसला साठ आणि शिवसेनेला ४० जागा ठरल्या आहेत. आणखी काही प्रभागांतील उमेदवारांची यादी अंतिम झाली नसून, त्यावर आज चर्चा पूर्ण होऊन रात्री उशिरापर्यंत निर्णय होईल, अशी माहिती शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, रमेश बागवे, अभय छाजेड, दीप्ती चवधरी, तसेच शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, कामगार नेते रघुनाथ कुचिक, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रशांत बधे आदी पदाधिकारी उपस्थित होते.पाटील म्हणाले, अपुरा पाणीपुरवठा, वाहतुकीची कोंडी, हिंजवडीतील वाहतूक समस्या, नवले पुलाजवळील अपघात, वाढती गुन्हेगारी, कोयता गँग अशा अनेक प्रश्नांची सत्ताधारी पक्षाला सोडवणूक करता आली नाही. उलट महापालिका धुवून खाल्ली. विरोधी पक्षांकडे उमेदवारच राहू नयेत, अशी चाल भाजप खेळत आहे. मात्र, आम्ही सर्व प्रभागांत सक्षम उमेदवार देऊ. भाजपने ज्यांना उमेदवारी नाकारली, ते आमच्या संपर्कात आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत चर्चा करून शंभर जागांचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) सोबत दोन वेळा चर्चा झाली. मी स्वतः अंकुश काकडे यांच्याशी बोललो. ते नंतर चर्चेला आले नाहीत. त्यानंतर आम्ही दोन पक्षांत जागा वाटप केले. वंचित बहुजन आघाडीचाही प्रस्ताव आला आहे. त्यांंच्याशीही पुण्यात चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. पुणेकरांचा आम्हालाच पाठिंबा – अहिर राज्यातील सत्ता एकत्र उपभोगायची आणि महापालिकेसाठी मात्र विरोधात लढण्यासाठी तात्पुरता घटस्फोट घ्यायचा, ही चाल पुणेकरांनी ओळखली आहे. आदित्य ठाकरे यांनी पुण्यासाठीचे ‘व्हिजन’ सादर केले आहे. पुणेकर आम्हालाच मतदान करतील, असा विश्वास शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी व्यक्त केला. शिवसेना- मनसे यांच्यात चर्चा सुरू असून, आतापर्यंत २१ जागांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. दोन्ही पक्ष त्यांच्या कोट्यातील जागा सोबतच्या समविचारी पक्षांशी चर्चा करून त्यांना देणार आहेत. त्या चर्चा सुरू असल्याने उर्वरित जागांवर अंतिम निर्णय झालेला नाही, असे सचिन अहिर यांनी सांगितले.