मांजरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०३० पर्यंत पुण्यासाठी ‘कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ तयार करण्यात आला असून, त्याअंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नव्याने समाविष्ट गावांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण आदी मूलभूत सुविधा पूर्ण होईपर्यंत मिळकतकरात सवलत देण्यात येणार आहे. भाजपच्या संकल्पपत्रातील सर्व योजना प्रभाग क्रमांक १५ मध्ये शंभर टक्के राबविण्यात येतील, असे आश्वासन भाजप उमेदवारांनी दिले. मांजरी बुद्रुक–केशवनगर–साडेसतरानळी–शेवाळेवाडी या प्रभाग क्रमांक १५ मधील भाजप व आरपीआय (आठवले गट) यांचे अधिकृत उमेदवार नंदा अनिल आबनावे, डॉ. दादा कोद्रे, सारिका अमित घुले व शिवराज बबनराव घुले यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी कोपरा सभा व पदयात्रांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदारांशी संवाद साधताना उमेदवारांनी ही माहिती दिली. उमेदवारांनी सांगितले की, वस्ती भागात प्रत्येक ३०० लोकसंख्येमागे एक सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात येईल. महिलांसाठी सवलतीच्या दरात मेट्रो व ‘पीएमपीएमएल’ बससेवा सुरू केली जाईल. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘पीएमपीएमएल’ बससेवेत मोफत प्रवासाची सुविधा दिली जाईल. प्रामाणिक करदात्यांना पुढील पाच वर्षे ४० टक्के करसवलत कायम ठेवण्यात येईल. तसेच, उद्यान, क्रीडांगण, जलतरण तलाव आणि ई-लर्निंग शाळा उभारण्यात येणार आहेत. यासाठी भाजप विचारांचे उमेदवार महापालिकेत पाठवणे आवश्यक असून, चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन शिवराज घुले, डॉ. दादा कोद्रे, सारिका घुले व नंदा आबनावे यांनी केले.