पुणे : स्वारगेट तसेच मध्यवर्ती पेठांच्या जवळचा भाग असलेल्या सुभाषनगर परिसरात गेल्या काही वर्षात पार्किंग, खराब रस्ते, अर्धवट विकासकामे यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. महापालिकेच्या माध्यमातून या समस्या सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे प्रभाग क्रमांक २५-ड (शनिवारपेठ- महात्माफुले मंडई) चे भाजपचे अधिकृत उमेदवार कुणाल शैलेश टिळक यांनी स्पष्ट केले. टिळक यांनी सोमवारी सुभाषनगर परिसरात पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधला यावेळी या भागातील नागरिकांनी या परिसरातील रस्त्यांची दुरावस्था, पदपथांचा अभाव, मुख्य रस्त्यालगत हा परिसर असल्याने वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग, पथदिवे बंद असणे अशा समस्यांचा पाढा यावेळी या भागातील मतदारांनी टिळक यांच्याकडे मांडला. या समस्या ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी मतदारांना दिले. प्राणव गंजिवाले, मुकेश राजावत आणि किरण कदम हे कार्यकर्ते उपस्थित होते. तर, या समस्या सोडविण्यासाठी तसेच या भागाचा आवाज महापालिकेत पोहचविण्यासाठी मतदारांनी आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी महापालिकेत निवडून द्यावे, असे आवाहन कुणाल टिळक यांनी यावेळी मतदारांना केले.