प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीवर शेवटच्या दिवशी तब्बल ९८६३ हरकती दाखल झाल्या. त्यामुळे, एकूण हरकतींची संख्या २२ हजार ८०९ वर पोहचली असून हरकतींच्या तपासणीसाठी प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. याद्या जाहीर झाल्यानंतरच अनेक इच्छुकांनी याद्यांमध्ये मोठया प्रमाणात गोंधळ असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने आडमुठेपणाची भूमिका घेत केवळ व्यक्तीगत तक्रारी घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सुरूवातीच्या आठवडयाभरात दोन ते तीन हजारच हरकती आल्या. निवडणुक आयोगाने पालिकेला सुनावत अशा चुकांची दुरूस्ती करण्याचे अधिकार आयुक्तांना असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मागील चार दिवसांत तब्बल १६ हजारांहून अधिक हरकती आल्या आहेत. हरकतींची मुदत संपली असून त्यावर दुरूस्ती करून त्या आयोगास कळविल्या जाणार असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले.सर्वांत जास्त हरकती सिंहगड राेड क्षेत्रीय कार्यालयात आल्या असून त्याची संख्या ६ हजार ३०८ इतकी आहे. त्यापाठाेपाठ नगर राेड – वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयात ५ हजार ६१७ हरकती नाेंदविल्या आहेत. धनकवडी क्षेत्रीय कार्यालय ( २ हजार ४७२ ), हडपसर – मुंढवा क्षेत्रीय कार्यालय ( २ हजार १८६ ), काेंढवा – येवले वाडी क्षेत्रीय कार्यालय ( १ हजार ३९७ ), वारजे – कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय ( १ हजार ११० ) अशा हरकती नाेंदविल्या आहेत. सर्वांत कमी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात ८७ हरकती नाेंदविल्या आहेत. ११७ मतदारयाद्यांची विक्री या प्रभाग रचनेच्या मतदारयादीच्या विक्रीतून महापालिकेस तब्बल १६ लाख २० हजार २०० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या दोन आठवडयात महापालिकेने ११७ याद्यांची विक्री केली आहे. त्यातून हे उत्पन्न मिळाले आहे. प्रभागांमध्ये मतदारांची ६५ हजारांपासून ते डीड लाखांच्या वर असल्याने मतदारयाद्यांची किंमत ११ हजार ते ४० हजारांपर्यंत होती. त्यामुळे अनेक इच्छुकांनी यादी खरेदीला मुरड घातली असली तरी झालेल्या विक्रीतून महापालिकेस मोठया प्रमाणात उत्पन्न मिळाले आहे.